श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
शेवाळलेले पदपथ, खड्डेमय रस्ते, बंद पथदिवे अन् डेंग्यू-मलेरियाचा धोका
महापालिका आयुक्तांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
नवी मुंबई: गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर आला असताना सानपाडा नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरातील नागरी समस्यांचे तातडीने निवारण करावे, अशी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माथाडी नेते पांडुरंग विठ्ठल आमले यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सानपाडा परिसरात नागरिकांसह गणेशभक्तांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर उत्सवापूर्वीच पालिका प्रशासनाने संपूर्ण परिसराची विशेष पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.
सानपाडा परिसरातील अनेक पदपथांवर शेवाळ साचल्याने ते निसरडे झाले आहेत. या ठिकाणी पालिकेकडून ब्लिचिंग पावडरची आवश्यक फवारणी करण्यात आलेली नसल्याचे आमले यांनी निदर्शनास आणले आहे. निसरड्या पदपथांमुळे नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत असल्याने गणेशोत्सवापूर्वी पदपथांची स्वच्छता करून ब्लिचिंग पावडरची फवारणी करावी, अशी मागणी पांडुरंग आमले केली आहे.
दरम्यान, परिसरात मलेरिया, डेंग्यू आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे आमले यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने धूरफवारणी अभियान राबवावे, गटारांमध्ये अळीनाशक औषधांची फवारणी करावी तसेच नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
सानपाडा नोड, सानपाडा गाव आणि सानपाडा पामबीच परिसरातील अंतर्गत तसेच बाह्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पालिकेकडून डांबराची डागडुजी करण्यात आली असली तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याचे आमले यांनी म्हटले आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी वाहतूक आणि नागरिकांची गर्दी लक्षात घेता रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पथदिव्यांची दुरुस्ती
ज्या ठिकाणी पदपथांची दुरवस्था झाली आहे, त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून काही ठिकाणी अंधुक प्रकाश मिळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, अंधुक प्रकाश देणारे बल्ब बदलून नवीन बल्ब बसवावेत आणि आवश्यक ठिकाणी नवीन पथदिवे बसवावेत, अशी मागणीही आमले यांनी केली आहे.
धोकादायक फांद्यांची छाटणी करण्याची मागणी
परिसरातील काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्यांची छाटणी अद्याप आवश्यक असल्याचे आमले यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांची आणि वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे धोकादायक किंवा वाढलेल्या फांद्यांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी छाटणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाहणी अभियानात सहभागी करून घेण्याची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सानपाडा गाव, सानपाडा पामबीच आणि सानपाडा नोडमध्ये तातडीने विशेष पाहणी अभियान राबवावे, अशी आग्रही मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे. या पाहणीमध्ये आढळणाऱ्या सर्व नागरी समस्यांची नोंद करून त्या गणेशोत्सवापूर्वीच सोडवाव्यात. तसेच पालिकेच्या या पाहणी अभियानात आपल्यालाही सहभागी करून घ्यावे, अशी विनंती आमले यांनी आयुक्तांना केली आहे.
समस्यांचे तातडीने निवारण करण्याची मागणी
“गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या काळात नागरिक आणि गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष परिसरात जाऊन समस्या जाणून घ्याव्यात आणि त्या तातडीने सोडवाव्यात,” अशी भूमिका माथाडी नेते पांडुरंग आमले यांनी मांडली आहे.
नागरी सुविधा, आरोग्य, रस्ते, पदपथ, पथदिवे आणि वृक्षांच्या फांद्यांशी संबंधित प्रश्न गणेशोत्सवापूर्वी मार्गी लागावेत, यासाठी पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी आमले यांनी केली आहे.