स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई वॉटर मेट्रोसह राज्यातील बंदर प्रकल्पांचा सविस्तर आढावा
बंदर विकासातून रोजगार आणि गुंतवणुकीला चालना देण्यावर भर
अन्य राज्यांतील उद्योजकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना
मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेला विकासाची नवी दिशा देण्यासाठी राज्यातील बंदर प्रकल्पांना आता अधिक वेग देण्याची भूमिका मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. बंदरे विभागामार्फत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचे सुयोग्य नियोजन करून त्यांची अंमलबजावणी वेगाने करावी आणि निर्धारित कालमर्यादेत प्रत्येक प्रकल्प पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मंत्री राणे यांनी बंदरे विभागातील विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पांची सद्यस्थिती, सुरू असलेली कामे, पुढील नियोजन तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीला आवश्यक असलेल्या बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘प्रकल्प कागदावर नकोत; प्रत्यक्ष जमिनीवर दिसले पाहिजेत’
महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या सागरी विकासाच्या संधी लक्षात घेता राज्यातील बंदरांच्या निर्मिती आणि विकासाला मोठा वाव असल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
बंदर विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा विषय नसून त्यातून रोजगारनिर्मिती, उद्योगवाढ, व्यापार आणि मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला चालना मिळू शकते. त्यामुळे उपलब्ध संधींचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याच्या दृष्टीने विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात बंदर विकासाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच या क्षेत्रात गुंतवणुकीची क्षमता असलेल्या अन्य राज्यांतील उद्योजकांशी अधिकाऱ्यांनी थेट संवाद साधावा, महाराष्ट्रातील बंदर प्रकल्प आणि गुंतवणुकीच्या संधी त्यांच्यासमोर मांडाव्यात आणि राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.
मुंबई वॉटर मेट्रोला गती देण्याचे आदेश
बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरला तो मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाचा. मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा मंत्री नितेश राणे यांनी आढावा घेतला.
प्रकल्पाच्या कामाला आणखी वेग देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.