जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
गंभीर आजार, पायांच्या समस्यांवर वर्षभर उपचार
१३ महिन्यांच्या उपचारांनंतर कोल्हापूरच्या दिशेने प्रवास
मुंबई : कोल्हापूरकरांची लाडकी ‘माधुरी’ उर्फ ‘महादेवी’ हत्तीण अखेर मायभूमीकडे परतत आहे. उच्चाधिकार समितीच्या परवानगीनंतर ११ सप्टेंबर रोजी वंतारातून तिचा कोल्हापूरकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ती १२ सप्टेंबरच्या आसपास नांदणीत पोहोचण्याची शक्यता आहे.
माधुरीची ही केवळ घरवापसी नाही; गंभीर प्रकृतीत वंतारात पोहोचलेल्या हत्तीणीला उपचार आणि पुनर्वसनातून सक्षम करण्याचा सुमारे १३ महिन्यांचा प्रवासही आहे. ३० जुलै २०२५ रोजी माधुरीला जामनगर येथील वंतारा केंद्रात आणण्यात आले होते.
गंभीर अवस्थेत वंतारात दाखल
माधुरीला प्रगत आर्थ्रायटिस, पायांशी संबंधित गंभीर समस्या आणि हालचालींमध्ये अडचणी होत्या. तिच्या पुनर्वसनासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. जलोपचार (हायड्रोथेरपी), फिजिओथेरपी, वैद्यकीय तपासण्या, संतुलित आहार आणि सुरक्षित, मऊ पृष्ठभागावरील निवास अशा विविध पद्धतींचा वापर करण्यात आला.
एक वर्षाहून अधिक काळ चाललेल्या या उपचारांनंतर माधुरीची प्रकृती सुधारली आणि ती कोल्हापूरला परतण्यासाठी सक्षम झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जून २०२६ मध्येच वंताराने ती अधिक मजबूत आणि निरोगी झाल्याचे सांगितले होते.
आंदोलनातून घरवापसीचा मार्ग
माधुरीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी स्थानिक पातळीवर मोठी जनभावना निर्माण झाली. आंदोलन, पदयात्रा आणि विविध स्तरांवरील पाठपुराव्यानंतर तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न उच्चाधिकार समितीसमोर आला. नांदणी येथे तिच्या निवासासाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केल्यानंतर ९ सप्टेंबर २०२६ रोजी उच्चाधिकार समितीने माधुरीला कोल्हापूरला परत नेण्यास परवानगी दिली.
घर कोल्हापूरचे; वैद्यकीय काळजी वंताराची!
माधुरीच्या परतीनंतरही तिच्या आरोग्याची काळजी थांबणार नाही, ही या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाची बाब आहे. माधुरी कोल्हापूरला गेल्यानंतरही वंतारा तिची वैद्यकीय देखभाल आणि आरोग्याचे निरीक्षण सुरू ठेवणार आहे. तज्ज्ञांकडून नियमित तपासणी व आवश्यक वैद्यकीय मदत दिली जाणार असल्याचे वंताराने स्पष्ट केले आहे.
माधुरीची घरवापसी ही केवळ एका हत्तीणीच्या पुनरागमनाची घटना नसून, जनभावना, न्यायालयीन प्रक्रिया आणि प्राणीकल्याण यांचा संगम ठरलेली कथा आहे. कोल्हापूरकरांना त्यांची ‘महादेवी’ पुन्हा मिळत असताना, तिच्या आरोग्याची जबाबदारी पुढेही वंतारा आणि संबंधित तज्ज्ञ यंत्रणांच्या देखरेखीखाली राहणार आहे.