जुन्नरकर वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबईतून कोकण, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराडकडे बस रवाना
बुकिंग केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची सुविधा
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देत शिवसेना नवी मुंबईच्या वतीने मोफत एसटी बस सेवेचे आयोजन करण्यात आले. नेरूळ सेक्टर २ येथील कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालयातून शुक्रवारी रात्री गणेशभक्तांना घेऊन दोन बस रवाना करण्यात आल्या.
कोकणातील मालवण तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड या भागांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बससेवा उपलब्ध करून देण्यात आली. रात्री सुमारे १०.३० वाजता बसेस रवाना झाल्या. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बस सुटण्यापूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. नेरूळ सेक्टर २,८,१० तसेच जुईनगरमधील रहिवाशी गणेशोत्सवासाठी या बसच्या प्रवासात सहभागी झाले.
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे व एसटीवर होणारी मोठी गर्दी लक्षात घेता मोफत बससेवेमुळे अनेक गणेशभक्तांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळाली.
या उपक्रमावेळी नवी मुंबई शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, कामगार नेते रवींद्र सावंत, उपशहरप्रमुख अशोक मुंगसे, विभागप्रमुख आनंद गायकवाड, सचिन साळवे, उपविभागप्रमुख बाबासाहेब जाधव, शाखाप्रमुख विजय अमराळे, सखाराम पाटील, राहुल सावंत, गजानन टाळे, दीपक गावडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात आले.