नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील विद्युत उपकेंद्रातील समस्या तातडीने सोडविण्याचे महावितरणला निर्देश देणेबाबत व केलेल्या कार्यवाहीबाबतचा लेखी अहवाल मागवून घेण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडकोच्या शिवम व सागरदीप या दोन गृहनिर्माण सोसायटीच्या मध्यभागी तसेच मेरेडियन टॉवर आणि शिवालिक सोसायटीच्या समोर महावितरणचे विद्युत उपकेंद्र आहे. हे उपकेंद्र कचऱ्याचे डम्पिंग, अस्वच्छता, बकालपणाचे, समस्यांचे माहेरघर झाले असून नशेडींचा अड्डा बनले आहे. या उपकेंद्राच्या संरक्षक भिंती तुटल्या असून उपकेंद्राचे आतील दरवाजेही सतत उघडे असतात. तसेच प्रवेशद्वारावरील छोटेखानी डीपीचेही दरवाजे उघडे आहेत. या उपकेंद्राच्या आवारात जंगली झुडूपे वाढली असून कचराही वाढत चालला आहे. सकाळी तसेच रात्रीच्या वेळेत उपकेंद्रातून येणाऱ्या दुर्गंधीचा स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील कचऱ्यामुळे सभोवतालच्या सोसायटीतील रहिवाशांना बाराही महिने डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. या उपकेंद्राच्या आतील भागात नशपाणी करण्यासाठी बाराही महिने नशेडींनी मुक्काम ठोकलेला आहे. काही महिन्यापूर्वी या उपकेंद्रासमोरच एका लहान मुलाच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी नशेडींनी त्याचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला होता. या उपकेंद्राची बकालपणाच्या तसेच समस्येच्या अणि नशेडीच्या विळख्यातून मुक्तता होणे आवश्यक असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
नशेडींमुळे कोणत्याही क्षणी काहीही दुर्घटना होण्याची भीती आहे. कचऱ्यामुळे डास वाढल्याने साथीच्या आजारांना खतपाणी मिळत आहे. बकालपणामुळे व दुरावस्थेमुळे परिसराच्या सौंदर्याला बाधा आली आहे. या निवेदनासोबत फोटो जोडत आहे. त्यामुळे निवेदन वाचण्यापेक्षा फोटोमुळे वस्तूस्थिती व समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. महावितरणला या उपकेंद्रातील समस्यांचे निवारण तातडीने करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
