नारायणगावमध्ये २६ दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण यशस्वी; महिला उद्योजिकांना प्रमाणपत्रांचे वितरण
जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
जुन्नर : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून त्यांच्यात उद्योजकतेची नवी उमेद निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्यमिता विकास संस्थेच्या (EDII), अहमदाबाद पुढाकाराने नारायणगाव येथे आयोजित करण्यात आलेला २६ दिवसांचा सूक्ष्म-कौशल्य उद्योजकता विकास (MSDP) प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या महिला प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करून त्यांच्या कौशल्याचा गौरव करण्यात आला.
भारतीय उद्यमिता विकास संस्था (EDII) आणि ॲक्सेंचर (Accenture) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण महिलांना केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या प्रशिक्षणादरम्यान महिलांना ज्यूटपासून विविध आकर्षक व उपयुक्त उत्पादने तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले. पुनर्वापरयोग्य साहित्याचा वापर करून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, त्यातून लघुउद्योग उभारणे आणि स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन निर्माण करणे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या सुप्त कौशल्यांना व्यासपीठ मिळाले असून, रोजगाराच्या शोधात राहण्याऐवजी स्वतः रोजगारनिर्मिती करण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांसाठी हा प्रमाणपत्र वितरण सोहळा केवळ गौरवाचा क्षण नसून उद्योजकीय वाटचालीची नवी सुरुवात ठरला.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य राजश्रीताई बोरकर, सरपंच शुभदा वाव्हळ, ग्रामपंचायत सदस्य भावना बेल्हेकर, सुप्रिया अडसरे, प्रिया खैरे, वंदना वाघचौरे, EDII च्या समन्वयक रजनी मिरके आणि मास्टर ट्रेनर कल्पना पवार उपस्थित होत्या.
ग्रामीण महिलांच्या हाताला कौशल्य, कष्टांना बाजारपेठ आणि स्वप्नांना उद्योजकतेची दिशा मिळाली, तर गावाच्या अर्थव्यवस्थेलाही नवी चालना मिळू शकते, असा आशावाद या उपक्रमातून व्यक्त होत आहे.