कर्वे समाजसेवा संस्थेच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर यश!
मुंबई /पुणे : कर्वे समाजसेवा संस्था, पुणे आणि दि पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यचळवळ राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय दिव्यांग बालनाट्य स्पर्धेत सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केले.
या नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन कर्वे समाजसेवा संस्थेचे विद्यार्थी ओमप्रकाश गवई यांनी केले, तर नाटकाचे व्यवस्थापन तन्मय गायकवाड यांनी सांभाळले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना अभिनयासाठी रौप्य पुरस्कार, तर प्रकाशयोजनेसाठी तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
संस्थेचे संचालक प्रा. (डॉ.) महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ नाट्यप्रयोग नसून दिव्यांग विद्यार्थ्यांना समान संधी, अभिव्यक्तीचे व्यासपीठ आणि आत्मविश्वास मिळवून देणारी एक महत्त्वपूर्ण सामाजिक चळवळ ठरली. कला, समावेशकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
