राज्य सरकार अंमलबजावणीसाठी सकारात्मक
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची ग्वाही
समितीचा अहवाल प्राप्त होताच शिफारशींनुसार निर्णय घेणार
मुंबई : राज्यातील कंत्राटी कामगारांच्या सेवाविषयक प्रश्नांना दिलासा देण्यासाठी हरियाणा पॅटर्नची अंमलबजावणी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, यासंदर्भात आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली. कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील शिफारशींच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कंत्राटी कामगारांसह विविध कामगार घटकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कंत्राटी कामगारांना अधिक संरक्षण आणि न्याय्य सेवा अटी मिळण्याच्या दृष्टीने हरियाणा पॅटर्नच्या अंमलबजावणीचा मुद्दा यावेळी मांडण्यात आला. त्यावर शासनाची सकारात्मक भूमिका असल्याचे फुंडकर यांनी सांगितले.
दरम्यान, कामगार विमा योजनेशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, असेही कामगार मंत्र्यांनी आश्वस्त केले. त्यामुळे कामगारांच्या सामाजिक सुरक्षा आणि विमा संरक्षणाच्या प्रश्नांवरही लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.
घरेलू कामगारांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्याबरोबरच नवीन कामगार कायद्यांच्या अनुषंगाने बांधकाम कामगारांसाठी प्रस्तावित असलेल्या योजनांच्या स्वरूपाबाबतही बैठकीत चर्चा झाली. या विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे फुंडकर यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सचिव अनिल डुमणे आणि प्रदेशाध्यक्ष किरण मिलगिर उपस्थित होते. कंत्राटी, घरेलू आणि बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर शासनस्तरावर पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.