‘हिरकणी महोत्सवा’ची जल्लोषात सांगता!
३०० महिला बचत गटांचा सहभाग
मनीषा शिंदे ठरल्या प्रथम क्रमांकाच्या ‘बेस्ट हिरकणी’
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महिला उद्योजिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या चार दिवसीय ‘हिरकणी महोत्सवा’ची ४ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात जल्लोषात सांगता झाली. महोत्सवात सहभागी झालेल्या सुमारे ३०० महिला बचत गट आणि संस्थांच्या उद्योजिकांनी आपल्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री केली. अंतिम दिवशी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महिला व बालकल्याण समितीच्या वतीने १ नोव्हेंबरपासून आयोजित या महोत्सवाच्या सांगता समारंभाला महापौर सुजाता पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार, समाजकल्याण समिती सभापती रंजना सोनवणे, प्रभाग समिती अध्यक्ष शैला पाटील, नगरसेविका प्रीती भगत, समाजविकास विभागाचे उपआयुक्त प्रकाश कांबळे, माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
महोत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘बेस्ट हिरकणी’ पुरस्काराने तीन महिला उद्योजिकांचा गौरव करण्यात आला. सुमारे ३०० महिला बचत गट आणि संस्थांच्या स्टॉलधारकांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उद्योजिकांची निवड करण्यात आली. यामध्ये मनीषा शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर मनीषा महाडिक यांनी द्वितीय आणि अनिता पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय लकी ड्रॉच्या माध्यमातून सहभागी महिला उद्योजिकांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी महापौर सुजाता पाटील यांनी महिला उद्योजिकांशी संवाद साधत त्यांच्या व्यावसायिक वाटचालीचे कौतुक केले. महिलांना उद्योग-व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल. पुढील हिरकणी महोत्सवही लवकरच आयोजित केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार यांनीही महिला उद्योजिकांच्या सहभागाचे कौतुक करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
महिला उद्योजकतेला प्रोत्साहन, स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवातून अनेक महिलांना आपल्या उत्पादनांची ओळख निर्माण करण्याची आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली. चार दिवसांच्या या उपक्रमाला नवी मुंबईकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरला. पुरस्कारांचा सन्मान, ग्राहकांची गर्दी आणि उद्योजिकांचा उत्साह अशा वातावरणात हिरकणी महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.