स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळीचा सण सर्वांनी एकत्र यावे ही शिकवण देतो. एकत्र येण्याने संवाद वाढतो, परस्परांमधील गोडवा वाढतो. त्यामुळे आज दिवाळी सणाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी, प्रशासन व पत्रकार यांनी एकत्र येऊन दिवाळी सण साजरा करणे ही अतिशय आनंददायी गोष्ट असून अशाच प्रकारे सर्वांनी आपल्या घरी कुटुंबियांसमवेत एकत्र येऊन फराळाचा आस्वाद घेत दिवाळी साजरी करावी आणि नाती घट्ट करावीत असे नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते त्याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, महिला व बालकल्याण समिती सभापती सलुजा सुतार, प्रभाग समिती अध्यक्ष शैला पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, शहर अभियंता शिरीष आरदवाड व इतर विभागप्रमुख तसेच विविध वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपमहापौर दशरथ भगत यांनी दिलखुलास शैलीत आचार्य अत्रे यांचे किस्से सांगत पत्रकारांशी असलेले नाते तसेच शहर विकासात असलेले पत्रकारांचे योगदान उलगडून सांगितले. आनंद देऊ, आनंद घेऊ, आनंदात राहू या भूमिकेतून काम करावे अशीही भूमिका त्यांनी मांडली.
महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत दिवाळी उत्सवाचा आनंद साजरा करताना आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांची आठवण ठेवून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत द्यावी असे आवाहन केले. त्याचप्रमाणे स्वच्छता आणि प्रदूषण हे दोन महत्वाचे घटक लक्षात घेत आपल्या शहराचा निवासयोग्य शहर हा नावलौकिक लक्षात घेऊन आपल्यामुळे वायू व ध्वनी प्रदूषण होणार नाही याची फटाके उडवताना दक्षता घ्यावी असेही आवाहन केले. सेवासुविधांनी परिपूर्ण शहराप्रमाणेच शहरातील नागरिकांचा आनंदाचा निर्देशांक वाढेल यावरही विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी शहराच्या विकासातील पत्रकारांचे महत्व अधोरेखित करीत शेरोशायरी सादर करीत स्नेहसंमेलनात रंग भरला. अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्यासह अनेक पत्रकारांनी मनोगत व्यक्त करीत दिवाळी शुभेच्छा दिल्या. तसेच कविता, गाणी , विनोद, आठवणी सादर करीत स्नेहसंमेलन यशस्वी केले.

