‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ अभियानातून सोसायट्यांमध्ये जनजागृती
विद्युत रोषणाई आणि फटाके हाताळताना काळजी घेण्याचे आवाहन
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षितपणे साजरा व्हावा, तसेच फटाक्यांमुळे होणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळता याव्यात, यासाठी नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या वतीने ‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ ही विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अग्निशमन विभागप्रमुख तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम सुरू आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्यासह अग्निशमन केंद्र अधिकारी आणि जवान विविध सोसायट्यांमध्ये जाऊन माहितीपत्रकांचे वाटप करीत आहेत. फटाके फोडताना आणि घरांवर विद्युत रोषणाई करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जात आहे. समाजमाध्यमांवरूनही जनजागृती केली जात आहे.
फटाके फोडताना घ्या ही काळजी
फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत. लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडू द्यावेत. शक्यतो बंद बूट आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी सुरक्षित चष्मा वापरावा. फटाके पेटवण्यासाठी लांब अगरबत्ती किंवा मेणबत्तीचा वापर करावा. घर, झाडे, विजेच्या तारा आणि ज्वलनशील वस्तूंपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेतच फटाके फोडावेत. एका वेळी एकच फटाका पेटवावा. आपत्कालीन परिस्थितीसाठी जवळ पाणी किंवा वाळूची बादली ठेवावी.
या चुका कटाक्षाने टाळा
घरात, इमारतीच्या जिन्यात, वाहनतळाजवळ तसेच गॅस पाइपलाइन आणि विद्युत तारांच्या परिसरात फटाके फोडू नयेत. हवेत उडणारी रॉकेट्स लोक, प्राणी किंवा घरांच्या दिशेने जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. न फुटलेला फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. फटाक्यांच्या बारुदात छेडछाड करू नये आणि फटाके खिशात ठेवू नयेत.
घरांवर विद्युत रोषणाई करताना ओव्हरलोडिंग किंवा अनधिकृत जोडण्या करू नयेत. ही कामे प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनकडूनच करून घ्यावीत, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.
‘दिवा उजळू दे प्रकाशाचा, नको अंधार निष्काळजीपणाचा’ हा संदेश देत अग्निशमन दलाने नागरिकांना सुरक्षिततेचे नियम पाळून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे.