चला, तयारीला लागा! दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत परीक्षांचा श्रीगणेशा
बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची १५ फेब्रुवारीपासून
प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखाही निश्चित
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे विषयवार वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीला आता वेग येणार आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे, यासाठी मंडळाने विषयानुसार सविस्तर वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे.
बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून
बारावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा पार पडणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसोबतच प्रात्यक्षिक परीक्षांचीही तयारी करावी लागणार आहे.
दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
दहावीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहेत. त्यामुळे लेखी परीक्षेपूर्वी या परीक्षांची तयारी पूर्ण करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असणार आहे.
परीक्षांचे महत्त्वाचे वेळापत्रक
| परीक्षेचा तपशील |
कालावधी |
| बारावी लेखी परीक्षा |
८ फेब्रुवारीपासून |
| बारावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा |
२० जानेवारी ते ६ फेब्रुवारी |
| दहावी लेखी परीक्षा |
१५ फेब्रुवारीपासून |
| दहावी प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा |
२८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी |
वेळापत्रक पाहा, अभ्यासाचे नियोजन करा!
बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी निश्चित दिशा मिळाली आहे. आता वेळ न दवडता प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करणे, कठीण विषयांना अधिक वेळ देणे, नियमित सराव करणे आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे. प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांच्या तारखांकडेही विद्यार्थ्यांनी विशेष लक्ष द्यावे.
विद्यार्थ्यांनी विषयवार परीक्षांच्या तारखा, वेळा आणि अधिकृत सूचनांची खातरजमा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करावी. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारही नियोजन करावे.