ध्वनिसंदेशांद्वारे जल बचत, प्रदूषण नियंत्रण आणि अग्निसुरक्षेचा संदेश
मालमत्ता कर भरण्याचेही नागरिकांना आवाहन
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : दिवाळीचा सण आनंदात आणि सुरक्षितपणे साजरा करण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण, पाणी बचत आणि शहराच्या विकासातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून आता एनएमएमटीच्या बसेसमधील ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे दिवाळीच्या शुभेच्छांसह जनजागृतीपर संदेश प्रसारित केले जात आहेत.
महापालिकेमार्फत होर्डिंग्ज, बॅनर्स आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून नागरिकांना जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण, अग्निसुरक्षा आणि लहान मुलांची सुरक्षितता याविषयी माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर शहर विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेला मालमत्ता कर वेळेत भरण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
या उपक्रमात आता एनएमएमटी बसेसची भर पडली असून, बसमधील ऑडिओ यंत्रणेद्वारे प्रवाशांपर्यंत हे संदेश पोहोचविले जात आहेत. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रकाशाचा सण असला तरी तो साजरा करताना पाण्याचा जपून वापर करावा, फटाक्यांचा वापर टाळावा किंवा मर्यादित ठेवावा, आगीच्या संभाव्य धोक्यांपासून सावध राहावे, लहान मुलांची काळजी घ्यावी आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन या संदेशांतून केले जात आहे.
मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आर्थिक आधार असल्याने नागरिकांनी थकीत कर त्वरित भरून संभाव्य कारवाई टाळावी, असेही ध्वनिसंदेशातून स्पष्ट करण्यात येत आहे.
‘आपली नवी मुंबई, आपला अभिमान, आपली जबाबदारी!’ हा संदेश दिवाळीच्या शुभेच्छांसोबत प्रवाशांपर्यंत पोहोचविण्याचा महापालिकेचा हा उपक्रम आहे.