शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवणाऱ्या पडद्यामागील कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त सन्मान; शिवसेना सानपाडा विभागाचा स्तुत्य उपक्रम
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत शिवसेना सानपाडा विभागाच्या वतीने दिवाळीनिमित्त भेटवस्तू वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. शिवसेनेचे सानपाडा विभागातील पदाधिकारी तथा मा. नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर यांचे पती सोमनाथ वास्कर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
सानपाडा नोडमध्ये स्वच्छता, मलनिस्सारण, पाणीपुरवठा, स्मशानभूमी, उद्याने, विद्युत, गॅस, हिवताप निर्मूलन, मूषक नियंत्रण, नागरी आरोग्य केंद्र, महापालिका शाळा तसेच आशा वर्कर्स अशा विविध विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी शहराच्या दैनंदिन व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहेत. नागरिकांना चांगल्या नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी हे कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळीच्या निमित्ताने भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार मारुती विश्वासराव यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, शहराच्या स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंत विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी आहे. सणासुदीच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोमल वास्कर आणि सोमनाथ वास्कर यांचे अभिनंदन केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित सावंत यांनीही समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रसंगी शिवसेना विभागप्रमुख विकास गाढवे, आशिष वास्कर, महिला आघाडीच्या सुलभाताई केसरकर, नेहा वास्कर, सुनील सिंग यांच्यासह शिवसैनिक आणि कर्मचारी उपस्थित होते.
सानपाड्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त सन्मान करण्याची परंपरा सोमनाथ वास्कर यांच्या पुढाकाराने सातत्याने जपली जात असून, या उपक्रमातून श्रमाचा सन्मान आणि माणुसकीचा दिवाळी संदेश अधोरेखित झाला.