२५० हून अधिक स्वच्छताकर्मींनी राबविली विशेष मोहीम
सकाळी स्वच्छ रस्ते पाहून नागरिकांकडून कौतुकाची थाप
नवी मुंबई : दिवाळीच्या जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी आणि बाजारपेठांमधील गर्दीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहराला स्वच्छतेची अनोखी भेट दिली. लक्ष्मीपूजनाच्या रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल २५ टनांहून अधिक कचरा संकलित करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी पाठविण्यात आला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना स्वच्छ रस्ते आणि चौक पाहायला मिळाल्याने महापालिकेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा आणि दुकाने नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली होती. खरेदी, फटाक्यांची आतषबाजी आणि उत्सवाच्या वातावरणामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते. नवी मुंबईचा स्वच्छ शहर म्हणून असलेला नावलौकिक कायम राखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.
अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली, मुख्य स्वच्छता अधिकारी राजूसिंह चव्हाण, नरेश अंधेर तसेच सर्व स्वच्छता अधिकारी, निरीक्षक आणि स्वच्छताकर्मींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. शहरातील आठही विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात २५० हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती.
या मोहिमेसाठी १० रिफ्युज कॉम्पॅक्टर आणि १३ मिनी टिपर वाहनांचा वापर करण्यात आला. मुख्य रस्ते, बाजारपेठा, चौक आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या ठिकाणांवरील फटाक्यांचा कचरा तसेच अन्य सुका कचरा युद्धपातळीवर संकलित करण्यात आला. जमा झालेला २५ टनांहून अधिक कचरा तातडीने तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.
विशेष म्हणजे, मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ही मोहीम राबवितानाच महापालिकेची नियमित सकाळची स्वच्छता सेवाही नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि परिसर स्वच्छ दिसून आले. पहाटेच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी स्वच्छतेचे हे चित्र पाहून समाधान व्यक्त केले.
या मोहिमेच्या यशाचे खरे श्रेय रात्रभर जागून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छताकर्मींना जाते. सण-उत्सवाच्या काळातही स्वतःच्या आनंदापेक्षा शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य देत कर्तव्य बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत असून, नवी मुंबईच्या स्वच्छतेमागील या हातांचे योगदान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.