४,७५१ शहरांना मागे टाकत स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोच्च मानाचा बहुमान
स्वच्छताकर्मींच्या अहोरात्र परिश्रमांना यशाचे श्रेय
नवी मुंबई : ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय प्रत्यक्षात साकारत नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये देशातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या काही वर्षांपासून स्वच्छतेच्या राष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागलेल्या नवी मुंबईने यंदा थेट अव्वल स्थानावर झेप घेत ऐतिहासिक यश संपादन केले. महापौर सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका प्रशासन, स्वच्छताकर्मी आणि नागरिकांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांना या पुरस्काराच्या रूपाने राष्ट्रीय स्तरावर पावती मिळाली आहे.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित दिमाखदार सोहळ्यात महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महापौर सुजाता पाटील यांनी हा सर्वोच्च सन्मान स्वीकारला. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहरलाल खट्टर, राज्यमंत्री तोखन साहू आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही या सोहळ्याला उपस्थित होते.
नवी मुंबईला देशात प्रथम क्रमांकावर पोहोचविण्याच्या वाटचालीत महापौर सुजाता पाटील यांच्या नेतृत्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय केवळ घोषवाक्य न ठेवता शहराच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी घेतली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधत स्वच्छतेच्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे यापूर्वी दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नवी मुंबईने यंदा देशातील ४,७५१ शहरांमध्ये अव्वल स्थान मिळविण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर महापौर सुजाता पाटील यांनी हा सन्मान संपूर्ण नवी मुंबईकरांचा असल्याची भावना व्यक्त केली. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान मिळणे हे आपले भाग्य असल्याचे सांगत त्यांनी हा पुरस्कार शहरातील नागरिकांसह अहोरात्र शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्या स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींना समर्पित केला. त्यांच्या मते, या यशामागे सर्वाधिक मोलाचा वाटा स्वच्छताकर्मींच्या निष्ठेचा, मेहनतीचा आणि सातत्यपूर्ण सेवेचा आहे.
शहरातील रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पहाटेपासून रात्रीपर्यंत कार्यरत असणाऱ्या हजारो सफाई कामगारांच्या श्रमांचे हे खऱ्या अर्थाने फलित आहे. ऊन, पाऊस आणि प्रतिकूल परिस्थितीची तमा न बाळगता कचरा संकलन, वर्गीकरण, वाहतूक आणि स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या या कर्मचाऱ्यांमुळेच नवी मुंबईच्या स्वच्छतेचा दर्जा सातत्याने उंचावत राहिला. महापौरांनीही या पुरस्काराचे श्रेय स्वच्छताकर्मींच्या योगदानाला देत त्यांच्या कामाचा यथोचित गौरव केला. उपमहापौर दशरथ भगत यांनीदेखील स्वच्छताकर्मींचे योगदान या यशातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक असल्याचे अधोरेखित केले.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या यशात नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले. दैनंदिन स्वच्छतेचा दर्जा राखणे, कचरा संकलन व वाहतुकीसाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचा वापर, ओल्या-सुक्या कचऱ्यावर स्वतंत्र प्रक्रिया, वस्त्र कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेसाठी देशातील पहिले केंद्र अशा विविध उपक्रमांनी नवी मुंबईच्या कामगिरीला बळ दिले.
याशिवाय पाण्याचा पुनर्वापर, प्लास्टिक बंदीसाठी उपाययोजना, ‘मायएनएमएमसी’ ॲप आणि सिटीझन ग्रीव्हन्स पोर्टलच्या माध्यमातून तक्रार निवारण, विद्यार्थ्यांचा व युवकांचा सहभाग आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत नवी मुंबईने यापूर्वीच सुपर स्वच्छ लीगमध्ये स्थान मिळविले असून, सप्ततारांकित कचरामुक्त शहर (जीएफसी) आणि वॉटर प्लस ही मानांकनेही कायम राखली आहेत. आता देशात प्रथम क्रमांक मिळवून नवी मुंबईने स्वच्छतेच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.