सुनेत्रा पवारांच्या एका वाक्याने राजकीय चर्चांना नवे वळण
‘वेळ येईल तशा गोष्टी समजतील’; तटकरे यांच्या विधानानंतर फडणवीसांचीही महत्त्वपूर्ण भूमिका
स्वयंंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
बारामती : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सूचक विधान आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘वेळ येईल तशा गोष्टी तुम्हाला समजतील’ असे म्हणत दिलेले उत्तर यामुळे विलिनीकरणाच्या चर्चांना नवे बळ मिळाले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय असा कोणताही निर्णय होऊ शकत नसल्याची भूमिका मांडल्याने या संभाव्य राजकीय समीकरणाला नवे आयाम मिळाले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय हालचाली आणि नेत्यांच्या विधानांची मालिका सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात घेतलेली भेट, दिवाळीनंतर एकत्र बसून चर्चा करण्याचे दिलेले संकेत आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी केलेले विधान यामुळे या विषयाची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली. ‘अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र दिसल्या असत्या,’ अशी भूमिका तटकरे यांनी मांडली होती. त्यानंतर त्यांनी सुनेत्रा पवार यांची काटेवाडी येथील निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले.
याच पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ११) बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांना विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ‘जशी वेळ येईल, तशा गोष्टी तुम्हाला समजतील,’ असे सूचक उत्तर देत त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. त्यांच्या या मोजक्या प्रतिक्रियेमुळे विलिनीकरणाचा होकार की नकार, याबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या. मात्र, या भेटीगाठींचा नेमका उद्देश आणि त्यामागे विलिनीकरणाची चर्चा आहे का, याबाबत स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी भाजपची साथ सोडल्यासच विलिनीकरणाबाबत चर्चा होऊ शकते, अशी भूमिका मांडल्याने दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासमोरील राजकीय पेचही अधोरेखित झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर भाजपला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होऊ शकत नसल्याचे स्पष्ट केल्याने सत्तेतील समीकरणांचा प्रश्न महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झालेच, तर नव्या पक्षाचे नेतृत्व कोणाकडे असेल, भाजपसोबतची युती कायम राहणार का, दोन्ही गटांतील नेत्यांची भूमिका काय असेल आणि शरद पवार यांची अंतिम भूमिका कोणती असेल, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
एकीकडे नेत्यांची सूचक विधाने, दुसरीकडे राजकीय भेटीगाठी आणि तिसरीकडे भाजपची भूमिका अशा घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे. विलिनीकरणाच्या दिशेने प्रत्यक्ष पावले पडणार की ही केवळ राजकीय चर्चांची धुरळेबाजी ठरणार, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.