वनमंत्री गणेश नाईक यांचे आवाहन; नवी मुंबईकरांच्या योगदानाचे कौतुक
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : स्वच्छतेच्या क्षेत्रात देशातील ४,७५१ शहरांमध्ये नवी मुंबईने प्रथम क्रमांक पटकावून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मात्र, हा बहुमान मिळविण्यापेक्षा तो कायम राखणे अधिक महत्त्वाचे आहे. स्वच्छतेचा हा राष्ट्रीय सन्मान केवळ पुरस्कार नसून, नवी मुंबईकरांच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. त्यामुळे स्वच्छतेतील प्रथम क्रमांक टिकवून ठेवणे ही लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वच्छता कर्मचारी आणि प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.
केंद्र सरकारच्या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६’ मध्ये नवी मुंबईने मिळविलेल्या ऐतिहासिक यशाबद्दल नाईक यांनी आनंद व्यक्त केला. या यशामागे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अहोरात्र कष्ट, महापालिका प्रशासनाचे नियोजन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग असल्याचे सांगत त्यांनी सर्वांचे मनापासून अभिनंदन केले. देशात तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकापर्यंतचा नवी मुंबईचा प्रवास हा एका दिवसाचा चमत्कार नसून, अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची आणि स्वच्छतेप्रती असलेल्या सामूहिक बांधिलकीची फलश्रुती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
१९९५ पासून नवी मुंबईकरांनी महापालिकेची जबाबदारी विश्वासाने सोपविली असून, शहराच्या विकासासोबतच स्वच्छता आणि नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्यावर सातत्याने भर दिला आहे. यापुढेही पाणीपुरवठा, शिक्षण, उद्याने, रुग्णालये, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन आणि दळणवळणाच्या क्षेत्रात आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी नियोजन सुरू असून, विक्रोळी-कोपरखैरणे उन्नत मार्गाबाबत लवकरच एमएमआरडीएसोबत बैठक होणार आहे. वाशी आणि ऐरोलीप्रमाणे घणसोली व नेरूळ येथेही नाट्यगृहे उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार होईपर्यंत अर्बन रिन्यूअल स्कीमला विरोध कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणे हे यश असले, तरी स्वच्छतेची संस्कृती प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा भाग बनविणे हेच खरे उद्दिष्ट आहे. देशात मिळालेला हा प्रथम क्रमांक नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाला समर्पित असल्याचे सांगत, या यशाचे खरे मानकरी शहरातील स्वच्छतादूत आणि जागरूक नागरिक असल्याची भावना गणेश नाईक यांनी व्यक्त केली.