सिंधुदुर्गच्या विकासाला नवी दिशा!
विमानसेवा आता कायम सुरू राहणार, पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही
रोजगाराच्या संधींचा लाभ स्थानिक तरुणांनी घ्यावा, आवाहन
चिपी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी गती देणारी चिपी-मुंबई विमानसेवा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे फ्लाय ९१ कंपनीच्या विमानसेवेचे चिपी विमानतळावर उत्साहात पुनरागमन झाले. यापुढे ही विमानसेवा कधीही बंद पडणार नाही, अशी ठाम ग्वाही देतानाच विमानसेवेमुळे निर्माण होणाऱ्या रोजगार आणि व्यवसायाच्या संधींचा लाभ जिल्ह्यातील तरुण-तरुणींनी घ्यावा, असे आवाहन नितेश राणे यांनी केले.
विमानसेवेच्या शुभारंभानिमित्त चिपी विमानतळावर उत्साहाचे वातावरण होते. ढोल-ताशांच्या गजरात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे औक्षण करून पुष्पगुच्छ आणि मिठाई देत स्वागत करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुंबईकडे रवाना होणाऱ्या पहिल्या प्रवाशाला त्यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला. या विमानसेवेच्या पुनरारंभामुळे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे सिंधुदुर्गला पर्यटनाच्या जागतिक नकाशावर अग्रस्थानी नेण्याचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडल्याचे नितेश राणे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिक तरुण-तरुणींना रोजगार मिळावा आणि जिल्ह्याची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी नारायण राणे यांनी विमानतळ आणि विमानसेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयांशी संपर्क, पत्रव्यवहार आणि केंद्रीय मंत्र्यांकडे केलेल्या प्रयत्नांमुळे विमानसेवा पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली. विमानतळ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या धावपट्टी, वेळेची मर्यादा, रस्ते, जागेची उपलब्धता आणि रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याच्या सुविधांसह विविध तांत्रिक बाबींची पूर्तता गेल्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या विमान कंपन्यांनाही येथून सेवा देण्याचा मार्ग खुला होणार आहे.
लहान शहरांमधील विमानतळांवर विमानसेवा नियमित सुरू ठेवण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने सिंधुदुर्ग विमानतळासाठी विशेष प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळाची मान्यता मिळवली. आर्थिक तरतुदीच्या कालमर्यादेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांकडे पाठपुरावा करून पूर्वलक्षी मान्यता मिळविण्यात आली. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्य शासनाचे नितेश राणे यांनी आभार मानले.
विमानतळाकडे केवळ प्रवासाची सुविधा म्हणून न पाहता रोजगारनिर्मितीचे मोठे साधन म्हणून पाहिले पाहिजे. विमानसेवेमुळे जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार असून टुरिस्ट गाड्या, हॉटेल व्यवसाय, पर्यटन मार्गदर्शन आणि अन्य पूरक सेवांमध्ये रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील. या संधींचा लाभ बाहेरील व्यावसायिकांऐवजी स्थानिक तरुण-तरुणींना मिळावा, यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला उत्पन्नाच्या बाबतीत राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असून, शासनाच्या उर्वरित तीन वर्षांत विकासाची अनेक कामे पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार नीलेश राणे यांनी विमानसेवा पुन्हा सुरू करणे हे मोठे आव्हान असल्याचे सांगितले. मुंबई, नवी मुंबई आणि गोव्यातील मोपा विमानतळामुळे निर्माण झालेली स्पर्धा तसेच तांत्रिक अडचणी असतानाही नितेश राणे यांनी जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून विमानसेवा सुरू करण्यात यश मिळविल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार दीपक केसरकर यांनीही मुंबई ही कोकणासाठी महत्त्वाची जोडणी असल्याने ही सेवा पुन्हा सुरू होणे आवश्यक होते, असे सांगितले. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत तिकीट दरात सुमारे तीन हजार रुपयांचे अनुदान मिळत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनाही विमानप्रवासाचा लाभ घेता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू झालेली चिपी-मुंबई विमानसेवा सिंधुदुर्गच्या पर्यटन, दळणवळण आणि रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, ही सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी केला.