• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, November 17, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 17, 2026

स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक, पण बॅनरबाजीवर प्रशासनाचा शून्य वचक !

adminbyadmin
in संपादकीय
0
स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक, पण बॅनरबाजीवर प्रशासनाचा शून्य वचक !

प्रति,
मा. डॉ. कैलास शिंदे

आयुक्त

नवी मुंबई महापालिका,
विषय : नवी मुंबई शहराला अनधिकृत बॅनर व होर्डिंगच्या विळख्यातून मुक्त करा! अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेला जबाबदार कोण? अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून दररोज कठोर कारवाई करण्याबाबत.

महोदय,

मी गेली अनेक वर्षे शहरात लागणाऱ्या अनधिकृत बॅनर व होर्डींगविरोधात कारवाई करावी, बॅनर व होर्डींग दररोज हटविले जावेत, हे होर्डींग व बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत यासाठी सातत्याने प्रशासनदरबारी लेखी तक्रारी करत आहे. कोणी माहितीचा अधिकार टाकून माहिती मागविल्यास त्यात माझे नाव नक्कीच आढळून येईल. तथापि अनधिकृत बॅनर व होर्डींग हटवण्याबाबत महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईस टाळाटाळ करत आहे. महापालिकेचे आर्थिक नुकसान हे लाखोंच्या घरात होत असतानाही पालिका प्रशासन कोणावरही फौजदारी गुन्हे दाखल करत नाही. नवी मुंबई शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार मिळाला आहे. बाहेरील शहरातील अथवा राज्यातील कोणी नवी मुंबईत आल्यास त्याला हा पुरस्कार या शहरास का देण्यात आला, याबाबत प्रश्न पडेल, इतकी भयावह परिस्थिती आहे. सातत्याने लेखी निवेदने देतोय, पण फारसा सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाचा भेटत नसल्याने आता आयुक्तसाहेब, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणास याच समस्येवर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे.

नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेच्या क्षेत्रात देशात प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार मिळवून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारलेल्या या पुरस्कारामुळे नवी मुंबईच्या लौकिकात भर पडली आहे. स्वच्छता, नियोजनबद्ध विकास आणि सुंदर नागरी रचना ही नवी मुंबईची ओळख असल्याचा अभिमान प्रशासनाकडून वारंवार व्यक्त केला जातो. मात्र, याच स्वच्छ आणि सुंदर शहराच्या रस्त्यांवर, चौकाचौकांत, पथदिव्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर व होर्डिंगचे जे काही विद्रूप प्रदर्शन सुरू आहे, ते पाहता शहराच्या सौंदर्याचा गळा घोटण्याचे काम नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होतो.

नवी मुंबई शहरातील अंतर्गत रस्ते असोत अथवा बाह्य रस्ते, प्रमुख चौक, रस्त्यांच्या दुतर्फा असलेले पदपथ, पथदिव्यांचे खांब, पामबीच मार्ग, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक ठिकाणे अशा सर्वच ठिकाणी अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, शुभेच्छा, जाहिराती, उद्घाटने, सत्कार समारंभ अशा विविध कारणांचा आधार घेत सार्वजनिक जागांवर बॅनर लावण्याची जणू स्पर्धाच सुरू आहे.

विशेष म्हणजे, काही ठिकाणी एकाच व्यक्तीचे किंवा संस्थेचे बॅनर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना, चौकांमध्ये आणि पथदिव्यांच्या खांबांवर मोठ्या संख्येने लावले जातात. अनेक बॅनर दिवसेंदिवस नव्हे, तर आठवडे आणि महिने तसेच लटकत असतात. काही ठिकाणी जुने बॅनर काढले जात नाहीत आणि त्यावर पुन्हा नवीन बॅनर लावले जातात. परिणामी, शहराच्या नियोजनबद्ध रचनेची आणि सौंदर्याची अक्षरशः विटंबना होत आहे.

नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, सध्या शहरातील अनेक रस्ते आणि चौक पाहिल्यास ते नियोजनबद्ध शहर वाटण्याऐवजी अनधिकृत जाहिरातींचे प्रदर्शनस्थळ वाटू लागले आहेत. शहराच्या सौंदर्यीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे त्याच शहराच्या विद्रूपीकरणाकडे डोळेझाक करायची, हा विरोधाभास प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविण्याची जबाबदारी आहे. शहरातील प्रत्येक विभागात अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्याकडे आवश्यक यंत्रणाही उपलब्ध आहे. असे असताना शहरातील प्रमुख रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट सुरू असताना या विभागाला तो दिसत नाही का? की दिसत असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे?

सर्वसामान्य नागरिकाने पदपथावर एखादी छोटी वस्तू ठेवली, रस्त्याच्या कडेला अतिक्रमण केले किंवा सार्वजनिक जागेचा वापर केला, तर त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यास प्रशासन तत्पर असते. मात्र, शहरभर शेकडो अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग लावले जात असताना संबंधितांवर कारवाई करण्याची वेळ आली की प्रशासनाची पावले का थबकतात? सामान्य नागरिकांसाठी नियमांचा बडगा आणि अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांसाठी मोकळे रान, असा दुहेरी न्याय महापालिकेत सुरू आहे काय?

अतिक्रमण विभागाने केवळ एखाद्या तक्रारीनंतर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच जागे होण्याची मानसिकता सोडली पाहिजे. शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविणे ही नियमित प्रशासकीय जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज शहराची पाहणी करून अनधिकृत बॅनर हटविण्याची कायमस्वरूपी यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविले जात आहेत काय, असा प्रश्न निर्माण होतो.

अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात केवळ बॅनर काढून टाकणे एवढीच कारवाई पुरेशी नाही. संबंधित व्यक्ती, संस्था, आयोजक तसेच जाहिरातदार यांच्यावर नियमानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई होणे आवश्यक आहे. सार्वजनिक मालमत्तेचा अनधिकृत वापर करून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसणे गरजेचे आहे.

महापालिकेकडे संबंधित कायदे आणि नियमांनुसार कारवाई करण्याचे अधिकार असताना प्रत्यक्षात किती अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले? किती जणांना दंड ठोठावण्यात आला? किती जाहिरातदारांवर कारवाई झाली? याची माहिती प्रशासनाने सार्वजनिक करावी.

एखाद्या अनधिकृत बॅनरवर कारवाई करून तो काढून टाकला, तर दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी पुन्हा नवीन बॅनर झळकतो. याचा अर्थ संबंधितांना महापालिकेच्या कारवाईची कोणतीही भीती राहिलेली नाही. बॅनर लावा, काही दिवस जाहिरातबाजी करा आणि महापालिकेने हटविल्यास पुन्हा दुसऱ्या दिवशी बॅनर लावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामागे दंडात्मक कारवाईचा अभाव आणि गुन्हे दाखल करण्यात असलेली उदासीनता कारणीभूत आहे का, याची आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी.

अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगचा प्रश्न केवळ शहराच्या सौंदर्यापुरता मर्यादित नाही. यामुळे महापालिकेच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे. जाहिरातींसाठी महापालिकेच्या नियमानुसार परवानगी घेणे, निर्धारित शुल्क भरणे आणि नियमांचे पालन करणे आवश्यक असते. मात्र, अनधिकृतपणे बॅनर आणि होर्डिंग लावून अनेक जण जाहिरातबाजी करतात. त्यामुळे महापालिकेला मिळू शकणारा जाहिरात महसूल बुडतो.

एकीकडे महापालिका विविध करांच्या माध्यमातून नागरिकांकडून महसूल वसूल करण्यासाठी प्रयत्नशील असते. दुसरीकडे, शहरातील सार्वजनिक जागांचा अनधिकृत जाहिरातींसाठी वापर करून काही घटक महापालिकेच्या महसुलावरच डल्ला मारत असताना प्रशासन गप्प का? अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांना अभय देऊन महापालिका स्वतःच्या उत्पन्नाचे नुकसान का सहन करत आहे?

अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविण्याबरोबरच त्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींकडून नियमानुसार दंड वसूल करणे, परवानगीविना जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबई शहरासाठी ही बाब अत्यंत गंभीर आहे. स्वच्छता म्हणजे केवळ रस्त्यांवरील कचरा उचलणे, कचराकुंड्या स्वच्छ ठेवणे किंवा नाले साफ करणे एवढेच नाही. शहराचे सार्वजनिक स्वरूप, रस्त्यांचे सौंदर्य, पदपथांची मोकळीक, पथदिव्यांची स्थिती आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता व सुबकता यांचाही स्वच्छतेच्या प्रतिमेशी थेट संबंध आहे.

मग शहराला देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळाल्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनरचा कचरा का वाढत आहे? रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाते, मग शहराच्या प्रत्येक चौकात आणि पथदिव्यांवर जाहिरातींचा कचरा टाकणाऱ्यांना अभय कशासाठी? कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे शहर विद्रूप होते, मग शेकडो बॅनर आणि होर्डिंगमुळे शहराचे होणारे विद्रूपीकरण प्रशासनाला दिसत नाही का?

स्वच्छतेचा पुरस्कार मिळविणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे; परंतु तो टिकविण्यासाठी शहराच्या सौंदर्याचे रक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे. पुरस्कार स्वीकारताना शहराच्या स्वच्छतेचा अभिमान व्यक्त करायचा आणि त्याच शहरातील सार्वजनिक जागा अनधिकृत जाहिरातींच्या विळख्यात अडकलेल्या असताना मात्र मौन बाळगायचे, हा प्रकार म्हणजे स्वच्छतेच्या संकल्पनेलाच हरताळ फासण्यासारखा आहे.

आपण नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून शहराच्या नियोजनबद्ध विकासाची आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहात. त्यामुळे या गंभीर विषयाकडे केवळ नियमित तक्रार म्हणून न पाहता प्रशासकीय उत्तरदायित्वाचा प्रश्न म्हणून पाहणे आवश्यक आहे.

अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगच्या विरोधात अधूनमधून होणाऱ्या दिखाऊ कारवाया पुरेशा नाहीत. कारवाईचा बडगा प्रत्यक्षात किती जणांवर उगारला जातो आणि त्यातून किती जणांना कायद्याचा धाक बसतो, हे महत्त्वाचे आहे. अन्यथा बॅनर काढण्याचे फोटो प्रसिद्ध होतील, प्रसिद्धिपत्रके निघतील; पण दुसऱ्या दिवशी त्याच जागी पुन्हा बॅनर दिसतील. अशा कारवाईतून शहराचे विद्रूपीकरण थांबणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व विभागांमध्ये रस्त्यांच्या दुतर्फा, चौक, अंतर्गत व बाह्य रस्ते, पामबीच मार्ग, पथदिव्यांचे खांब, उद्याने, क्रीडांगणे आणि सार्वजनिक ठिकाणी लावलेले सर्व अनधिकृत बॅनर व होर्डिंग तातडीने हटविण्यात यावेत. शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग हटविण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र नियमित पथक नियुक्त करून दररोज सकाळी आणि संध्याकाळी पाहणी करण्यात यावी. अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग लावणाऱ्या व्यक्ती, आयोजक, जाहिरातदार व संबंधित संस्थांविरोधात लागू कायदे व नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच पात्र प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. वारंवार अनधिकृत बॅनर लावणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. एकाच व्यक्तीने किंवा संस्थेने पुन्हा पुन्हा नियमांचे उल्लंघन केल्यास वाढीव दंडात्मक कारवाई करावी. अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगमुळे महापालिकेचे किती जाहिरात उत्पन्न बुडत आहे, याचा विभागनिहाय आढावा घेऊन महसुली नुकसानीला जबाबदार असलेल्या बाबींची चौकशी करावी. शहरातील अधिकृत जाहिरात फलक आणि अनधिकृत जाहिरात फलक यांचे सर्वेक्षण करून अधिकृत जाहिरातींची माहिती सार्वजनिक करावी. अनधिकृत जाहिरात फलकांवर तातडीने कारवाई करावी. प्रत्येक विभागातील अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगविरोधातील कारवाईचे स्पष्ट उद्दिष्ट निश्चित करून द्यावे. कारवाईत हलगर्जीपणा अथवा जाणीवपूर्वक दुर्लक्ष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय जबाबदारी निश्चित करावी. अनधिकृत बॅनर हटविल्यानंतर त्याच जागी पुन्हा बॅनर लावले जाणार नाहीत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. पथदिव्यांचे खांब, वाहतूक चिन्हे, सिग्नल आणि सार्वजनिक सुविधांवर बॅनर लावण्यास प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. वाहनचालकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण करणाऱ्या जाहिरातींवर तातडीने कारवाई करावी. शहरातील अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगविरोधात झालेल्या कारवाईचा मासिक अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा. त्यामध्ये हटविलेल्या बॅनरची संख्या, आकार, वसूल केलेला दंड, दाखल केलेले फौजदारी गुन्हे आणि संबंधित कारवाईचा तपशील द्यावा.

नवी मुंबई शहराला देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छतेचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी महापालिकेने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मात्र, हा पुरस्कार केवळ सन्मानचिन्हापुरता मर्यादित राहू नये. शहरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक, प्रत्येक उद्यान आणि प्रत्येक सार्वजनिक जागा स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त दिसली पाहिजे. शहरातील अनधिकृत बॅनर हटविण्यासाठी महापालिकेला कोणी विशेष निमंत्रण देण्याची गरज नाही. त्यासाठी नागरिकांनी वारंवार तक्रारी कराव्यात, वर्तमानपत्रांनी बातम्या प्रसिद्ध कराव्यात आणि त्यानंतरच प्रशासनाने जागे व्हावे, ही बाब खेदजनक आहे. शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात काय सुरू आहे, याची माहिती ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

शहरात बॅनर लावणाऱ्यांचा उत्साह वाढत आहे आणि ते हटविणाऱ्या प्रशासनाचा उत्साह मात्र कमी होत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांना कायद्याचा धाक नसेल आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नसतील, तर अशा कारवायांचा उपयोग तरी काय? शहराच्या सौंदर्याचा बळी देऊन कोणाची जाहिरातबाजी सुरू ठेवायची, हा प्रश्न आता प्रशासनाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.

शहराला स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळवून देणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्या शहराचे सौंदर्य टिकविणेही महत्त्वाचे आहे. पुरस्काराच्या कौतुकात रमण्यापेक्षा शहराला अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी कठोर पावले उचला. अन्यथा स्वच्छतेच्या देशातील पहिल्या क्रमांकाच्या शहराच्या रस्त्यांवर अनधिकृत जाहिरातींचेच साम्राज्य दिसत राहील आणि स्वच्छतेच्या पुरस्काराची चमक या बॅनरच्या विद्रूपीकरणात हरवून जाईल. आपण या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी, ही अपेक्षा.

आपला विश्वासू,

संदीप उत्तम खांडगेपाटील

Previous Post

नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला १४९ समूहांचा उदंड प्रतिसाद!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com