२० नोव्हेंबरपासून तीन दिवसीय ‘इगास महोत्सव’; रामरथ यात्रेने होणार शानदार शुभारंभ
स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : उत्तराखंडच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा, परंपरांचा आणि लोककलेचा अनोखा सांस्कृतिक आविष्कार नवी मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. देवभूमी सोशल फाउंडेशन (डीएसएफ), मुंबई यांच्या वतीने २०, २१ आणि २२ नोव्हेंबर २०२६ रोजी नेरूळ येथील रामलीला मैदानावर तीन दिवसीय ‘इगास महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत प्रथमच आयोजित होणाऱ्या या महोत्सवाचा शुभारंभ २० नोव्हेंबर रोजी भव्य रामरथ यात्रेने होणार आहे.
उत्तराखंडच्या पारंपरिक लोकगीतांचा, नृत्यांचा, संगीताचा आणि सांस्कृतिक वारशाचा सुरेल संगम या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे. यासोबतच उत्तराखंडमधील पारंपरिक खाद्यपदार्थ, धान्ये, पाककृती आणि जैविक उत्पादनांचे विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
महोत्सवाचे संकल्पना व रचनाकार सुरेश काला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी रामरथ यात्रा, उत्तराखंडचे वीर योद्धे भड माधोसिंह भंडारी यांच्या शौर्यगाथेचे स्तवन आणि प्रभू श्रीरामांची महाआरती अशा भक्तिमय वातावरणात महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर झुमैलो, झोड़ा, चांचरी आणि मंडाण या उत्तराखंडच्या पारंपरिक लोकगीतांची विशेष सांस्कृतिक मैफल रंगणार आहे.
महोत्सवाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी उत्तराखंडमधील नामवंत कलाकार आपल्या बहारदार कलाविष्कारातून प्रेक्षकांना देवभूमीच्या लोकसंस्कृतीची सफर घडविणार आहेत. सुप्रसिद्ध लोकगायक पद्मश्री डॉ. प्रीतम भरतवाण हे आपल्या संचासह विशेष सादरीकरण करणार आहेत. तसेच संगीतकार रणजीत सिंह यांच्या नेतृत्वाखालील ‘उत्तराधुन’ बँड आणि त्यांचा कलाकार संच हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
या महोत्सवाच्या माध्यमातून उत्तराखंडची संस्कृती, लोकपरंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच मुंबई आणि नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या उत्तराखंडी बांधवांना आपल्या सांस्कृतिक मुळांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
देवभूमी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज भट्ट, महासचिव गोविंद आर्य आणि इगास महोत्सव आयोजन समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी भट्ट यांनी मुंबई, नवी मुंबई आणि परिसरातील सर्व उत्तराखंडी नागरिकांना कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

