वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नामकरण सोहळा
सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखैरणे सेक्टर ११ येथील सीबीएसई शाळा क्रमांक ९४ ला माजी महापौर कै. तुकाराम रामचंद्र नाईक यांचे नाव देण्यात आले आहे. या शाळेचे ‘कै. तुकाराम रामचंद्र नाईक विद्यालय’ असे नामकरण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या नामकरण सोहळ्याच्या माध्यमातून नवी मुंबईच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या माजी महापौरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
सभागृहनेते तथा स्थानिक नगरसेवक सागर नाईक यांनी मांडलेल्या नामकरण प्रस्तावाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर हा नामकरण सोहळा पार पडला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, उपमहापौर दशरथ भगत, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, माजी महापौर तथा नगरसेवक जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, प्रभाग समिती अध्यक्ष चंद्रभागा मोरे, पाणीपुरवठा समिती सभापती रविकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कै. तुकाराम रामचंद्र नाईक यांचे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून शहराच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. १९९८-९९ या कालावधीत त्यांनी महानगरपालिकेचे सभागृहनेते म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर १९९९-२००० मध्ये महापौरपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात त्यांची भूमिका राहिली. महाराष्ट्र महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी नवी मुंबईत राज्यातील विविध शहरांच्या महापौरांचे राज्यस्तरीय अधिवेशनही आयोजित केले होते.
त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाची आणि शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याची आठवण कायम राहावी, या उद्देशाने कोपरखैरणे सेक्टर ११ येथील महापालिका शाळेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळेच्या नामकरणामुळे नव्या पिढीला शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या नेतृत्वाच्या कार्याची ओळख होण्यासही मदत होणार आहे.
याप्रसंगी माजी नगरसेवक लिलाधर नाईक, शंकर मोरे, वैभव नाईक, नगरसेवक मुनावर पटेल, वैष्णवी नाईक, अदिती नाईक, संदीप म्हात्रे, डी. आर. पाटील, शिरीष पाटील, मिनाक्षी पाटील आदी उपस्थित होते. तसेच परिमंडळ-२ चे उपआयुक्त संजय शिंदे, कोपरखैरणे विभागाच्या सहाय्यक आयुक्त साधना पाटील, शिक्षणाधिकारी अशोक कडुस, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, उपअभियंता संतोष शिकतोडे यांची उपस्थिती होती. नगरसेविका वैष्णवी वैभव नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.