नेरूळमध्ये ६ ते १७ जानेवारीदरम्यान १२ दिवस रंगणार आगरी-कोळी महोत्सव
आगरी-कोळी संस्कृतीचा जागर मांडण्यासाठी नामदेव भगत यांचा पुढाकार !
सखापाटील जुन्नरकर : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : आगरी-कोळी समाजाची अस्मिता, परंपरा, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अखिल आगरी-कोळी समाज प्रबोधन ट्रस्टच्या माध्यमातून सिडकोचे माजी संचालक, नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना आगरी-कोळी समाज राज्य समन्वयक नामदेव भगत यांनी आगरी-कोळी महोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा पुढाकार घेतला आहे. यंदा बुधवार, ६ जानेवारी २०२७ ते रविवार, १७ जानेवारी २०२७ या कालावधीत नेरूळ येथील श्री गणेश रामलीला मैदान, सेक्टर १२ येथे सलग बारा दिवस हा महोत्सव रंगणार आहे.
नवी मुंबईच्या विकासाच्या प्रवासात आगरी-कोळी समाजाचे योगदान मोठे आहे. मात्र, शहरीकरणाच्या झपाट्याने बदलत चाललेल्या वातावरणात या समाजाची पारंपरिक जीवनशैली, लोककला, खाद्यसंस्कृती आणि रूढी-परंपरा मागे पडू नयेत, यासाठी नामदेव भगत यांनी आगरी-कोळी महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक व्यासपीठ उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन करणारा उपक्रम ठरत आहे.
आगरी-कोळी समाजाची अस्सल खाद्यसंस्कृती, पारंपरिक वेशभूषा, मासेमारीशी निगडित जीवनशैली, ग्रामसंस्कृती, लोककला आणि परंपरांचे दर्शन या महोत्सवात घडणार आहे. आगरी पद्धतीचे पारंपरिक खाद्यपदार्थ, कोळी पद्धतीचे विविध मासळीचे पदार्थ, गावठी जेवण, भाकरी यांसह विविध खाद्यपदार्थांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक नृत्य, मनोरंजनाचे उपक्रम आणि विविध आकर्षणांमुळे महोत्सवाला उत्सवी स्वरूप प्राप्त होणार आहे.
महोत्सवाची प्रमुख आकर्षणे
-
आगरी-कोळी समाजाच्या ग्रामसंस्कृतीचे देखावे.
-
पारंपरिक आगरी-कोळी खाद्यपदार्थ.
-
विविध प्रकारच्या ताज्या व सुका मासळीचा बाजार.
-
गावठी मटण आणि भाकरी.
-
कोळी नृत्य, लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
-
लावणी, गायन आणि नृत्य स्पर्धा.
-
लहान मुलांसाठी खेळणी, पाळणे आणि फनफेअर.
-
समाजातील ज्येष्ठ मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान.
महोत्सवातून संस्कृतीच्या मुळांशी नाते जोडण्याचा प्रयत्न
आजच्या आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत नव्या पिढीला आपल्या पूर्वजांची जीवनपद्धती, संघर्ष, व्यवसाय आणि सांस्कृतिक वारसा समजावा, हा या महोत्सवामागील महत्त्वाचा विचार आहे. आगरी-कोळी समाजाची ओळख केवळ पारंपरिक व्यवसायापुरती मर्यादित नसून त्यामागे समृद्ध इतिहास, सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाशी जोडलेले जीवनदर्शन आहे. हे सांस्कृतिक वैभव समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नामदेव भगत यांनी महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्नशील भूमिका घेतली आहे.
समाजाला एकत्र आणणारे सांस्कृतिक व्यासपीठ
आगरी-कोळी महोत्सवाच्या निमित्ताने विविध समाजघटकांना एकत्र येण्याची संधी मिळते. स्थानिक कलाकार, खाद्यपदार्थ व्यावसायिक, छोटे उद्योजक आणि पारंपरिक व्यवसायांशी संबंधित घटकांना आपली कला व कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. त्यामुळे सांस्कृतिक जतनाबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगार आणि व्यवसायाच्या संधींनाही चालना मिळण्यास मदत होते.
नामदेव भगत यांच्या पुढाकारातून आयोजित होणारा यंदाचा बारा दिवसीय आगरी-कोळी महोत्सव नवी मुंबईकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, रायगड आणि परिसरातील नागरिकांनी या महोत्सवाला भेट देऊन आगरी-कोळी संस्कृतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजक नामदेव भगत यांच्यावतीने करण्यात आले आहे.