मारवाड, काटेवाड, पंजाब,नुक्रा जातींच्या ११८० घोड्यांची आवक !
सूर्यकांत आसबे : ९९२१८८६६८२
सोलापूर : कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर २००९ मध्ये अकलूजमध्ये सुरू झालेल्या घोडे बाजारात मारवाड, काटेवाड, नुक्रा, पंजाब जातींच्या ११८० घोड्यांची आवक झाली आहे. आतापर्यंत २७९ घोड्यांच्या विक्रीमधून सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात,पंजाब, कर्नाटकमधून घोडे अकलूजमध्ये विक्रीसाठी आले आहेत.
अडीच फुटी टॉईज हॉर्स
घोडे बाजारात भूतानमधील ३० महिन्यांचा अडीच फुटी टॉईज हॉर्स अर्जुनची किंमत १ लाख ५१ सांगितली आहे. मागणी मात्र १ लाख ११ हजारपर्यंत आहे. लहान मुलांसाठी हा घोडा पाळला जातो . मवाळ स्वभावाचा आणि उंची कमी असणारा हा घोडा असल्यामुळे श्रीमंत लोक आपल्या मुलांसाठी हे घोडे पाळण्यासाठी घेऊन जातात.
“सिकंदर “आणि “बादशहा” घोडा खातोय भाव !
अकलूजच्या घोडेबाजारामध्ये इंदापूर येथील शिवगड स्टड फार्मचे पंजाबी नुक्रा जातीच्या सिकंदर या पाच वर्षाच्या तर अत्यंत कमी उंचीचा पांढराशुभ्र घोड्यांची किंमत ५१ लाख रुपये सांगण्यात आली आहे .मात्र २५ लाख रुपयांना या घोड्याला मागणी झाली आहे. विभूती रंगाच्या कल्याणी घोडीला २५ लाख रुपयांची किंमत लावली आहे .मात्र १८ लाखांपर्यंत मागणी झाली आहे .उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील व्यापारी अशपाक अली यांच्या बादशहा या पाच वर्षे वयाच्या देखण्या घोड्याची ३० लाख रुपये किंमत सांगण्यात आली आहे. परंतु १७ लाखाची मागणी झाली आहे. तसेच राकट रंगाच्या गोल्डन घोडीची किंमत १५ लाख रुपये लावण्यात आली आहे. ११ लाखांपर्यंतची तिला मागणी झाली आहे.
पारदर्शी व्यवहार आणि सोईसुविधा
अकलूजचा घोडेबाजार हा अतिशय सुरक्षित आहे. व्यवहारसुद्धा पारदर्शी केले जातात. बाजारामध्ये आलेले व्यापारी व घोडे यांच्यासाठी या ठिकाणी मुबलक सुविधा दिल्या जातात. त्यामुळे गेल्या १७ वर्षापासून आपण घोडे खरेदी – विक्रीसाठी अकलूजच्या बाजारात येत असल्याचे उत्तर प्रदेशचे व्यापारी अशपाक अली यांनी सांगितले.