स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या विविध नागरी प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अशोक भाऊसो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाली.
यामध्ये नेरूळ विभागातील सेक्टर १६ ए येथील अंतर्गत रस्त्याचा पृष्ठभाग खराब झालेला असून विविध संस्थांमार्फत वेगवेगळ्या कामांसाठी अनेकदा खोदकाम झल्याने रस्त्याची पातळी असमतोल झालेली आहे. पावसाळी कालावधीत रस्त्याचा पृष्ठभाग खड्डे पडून खराब झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. यादृष्टीने सदर रस्त्याची डांबरीकरणाने सुधारणा करणे कामाकरिता रू. ६२ लक्ष ८२ हजार रक्कमेस स्थायी समितीने मंजूरी दिलेली आहे.
तसेच नेरूळ सेक्टर १८ येथील दिपसागर सोसायटी ते वझिराणी चौकापर्यंतच्या व मंगलमूर्ती सोसायटीपासून सुयोग सोसायटीपर्यंतच्या रस्त्याची सुधारणा करणेकरिता रू. ४७ लक्ष ७६ हजार रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. त्याचप्रमाणे बेलापूर विभागातील सीबीडी से. ९ येथील ग्रीन व्हॅली ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याची आणि कलव्हर्टची सुधारणा करणेच्या रू. १ कोटी १९ लक्ष रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. या रस्त्याची रूंदीही वाढणार आहे.
याशिवाय बेलापूर विभागातील से. ८ एबीसीडी बेलापूर येथील अरेंजा कॉम्प्लेक्स सर्कल ते बस डेपोपर्यंतच्या पदपथाची दूरवस्था झालेली असून नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याच्या दृष्टीने सदर पदपथाची सुधारणा करणेच्या रू. ४९ लक्ष ३८ हजार रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. अशाचप्रकारे कोपरखैरणे सेक्टर १८ प्लॉट नं.१९-२२ समोरील गटर सिडकोकालीन असून त्याच्या काही भागात स्लॅब व परदीचे स्टील गंजलेले आहे. तसेच पेव्हर ब्लॉकही उखडलेले आहेत. हे गटर व त्यावरील पदपथ कोपरखैरणे बस डेपोकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असून त्याठिकाणी शाळा, कॉलेज, मध्यवर्ती स्मशानभूमी असल्याने नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे त्याठिकाणी दुर्घटना घडू नये यादृष्टीने गटर व पदपथ सुधारणेच्या रू. ३३ लक्ष ६३ हजार रक्कमेच्या कामास मंजूरी प्राप्त झालेली आहे.
कोपरखैरणे मध्ये हलधर नाईक उद्यान ते महावितरण कार्यालय पर्यंतचे गटार व पदपथाची सुधारणा करणेच्या रू. १४ लक्ष १३ हजार रक्कमेच्या कामास मंजूरी प्राप्त झालेली आहे. या कामामुळे सिडकोकालीन दूरवस्था झालेल्या गटारे व पदपथाची दुरूस्ती होऊन नागरिकांसाठी सुविधाजनक होणार आहे.
अशाचप्रकारे ऐरोली विभागात प्र.क्र.११ मधील विविध चाळींमधील गटारे व पदपथ नादुरूस्त झाल्याने त्या अरूंद गल्ल्यांमधील गटारे व पदपथांच्या दुरूस्तीचा रू. ५३ लक्ष ९६ हजार रक्कमेचा ठराव मंजूर झाला असून या कामामुळे तेथील नागरिकांचा त्रास दूर होणार आहे.
तुर्भे विभागातील हनुमाननगर येथील नवीन उच्चस्तरीय व भूस्तरीय जलकुंभाचे काम पूर्ण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे कामाच्या रू. २ कोटी ८ लक्ष रक्कमेस मंजूरी देण्यात आली. तसेच वाशी सेक्टर १० ए मधील जलउदंचन केंद्रामध्ये पंपाद्वारे बुस्टींग करून पाणीपुरवठा करणे व इतर अनुषांगिक कामे करणेच्या रू. ७८ लक्ष ४७ हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीची सर्वानुमते मंजूरी प्राप्त झालेली आहे.
मलनि:स्सारण व्यवस्थापनात सुधारणा आणण्याच्या दृष्टीने कोपरखैरणे बोनकोडे येथे सन २०१० मध्ये टाकलेल्या मलनि:स्सारण वाहिन्या परिसरातील वाढलेल्या लोकसंख्येमुळे अतिरिक्त ताणामुळे वारंवार तुंबत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी त्या वाहिन्या खराब झाल्या आहेत तसेच बरेच चेंबरही तुटलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी तेथील मलनि:स्सारण वाहिन्यांची सुधारणा करून त्यांची क्षमता वाढविण्याच्या रू. १ कोटी १६ लक्ष रक्कमेच्या कामास स्थायी समितीने मंजूरी दिलेली आहे. अशाच प्रकारचा मलनि:स्सारण वाहिन्या सुधारणा कामांचा महापेगाव येथील रू. १ कोटी २७ लक्ष रक्कमेच्या कामाचा प्रस्ताव आणि तुर्भेगाव येथील सेक्टर २२ मधील मलनि:स्सारण वाहिन्या सुधारणा कामाचा रू. ८४ लक्ष ४२ हजार रक्कमेच्या कामाचा प्रस्ताव यांस सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यामुळे सांडपाणी व्यवस्थापनला सुयोग्यता येऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले काम होणार आहे.
शाळेच्या गुणवत्तावाढीसोबतच शैक्षणिक सुविधा सुधारणेच्या दृष्टीने व विद्यार्थी, शिक्षकांना शिकण्यासाठी उत्साहवर्धक चांगले वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने इंदिरानगर, तुर्भे येथील नमुंमपा शाळा क्र. २५ व ७१ च्या इमारत दुरूस्तीचा व रंगरंगोटी करण्याच्या रू. ४१ लक्ष ७ हजार रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली तसेच वाशी सेक्टर ९ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील पदपथ व संरक्षक भिंतीची सुधारणा करणेच्या रू. २ कोटी ८० लक्ष रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली.
अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये विविध सुविधा कामांना तसेच सेवांना मंजूरी मिळाली असून याद्वारे नागरिकांना आवश्यक अशा नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.