स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
मॅफ्को मार्केटमागील सप्तशृंगी ऑइल कंपनीचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी
सहा अग्निशमन केंद्रांच्या गाड्या घटनास्थळी, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर १८ येथील मॅफ्को मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या सप्तशृंगी ऑइल कंपनीच्या गोदामाला रविवारी (२२ नोव्हेंबर) रात्री भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तेलाचा मोठा साठा आणि ज्वलनशील साहित्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. गोदामातून आगीचे उंचच उंच लोळ आणि धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत असून, अधूनमधून ऐकू येणाऱ्या स्फोटसदृश आवाजांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सानपाडा सेक्टर १८ मधील प्लॉट क्रमांक ३८ येथे ही कंपनी असून, या परिसरात अनेक औद्योगिक कंपन्या आणि गोदामे आहेत. त्यामुळे आग शेजारील आस्थापनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी ऐरोली, रबाळे, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ आणि सीबीडी बेलापूर अशा सहा अग्निशमन केंद्रांतील गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
वाशी अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी रोहन कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. जवान गोदामात प्रवेश करून आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, तेलाचे ड्रम आणि अन्य ज्वलनशील साहित्यामुळे आग नियंत्रणात आणताना अडचणी येत आहेत. घटनास्थळी पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणाही दाखल झाल्या आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, रविवारची सुट्टी असल्याने गोदामात कामगारांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना घडूनही सुदैवाने जीवितहानी टळल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, गोदामातील तेलाचा साठा, यंत्रसामग्री आणि अन्य साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सप्तशृंगी ऑइल कंपनीची स्थापना १९९७ मध्ये झाल्याची माहिती असून, खाद्यतेल, डाळी आणि अन्य कृषी उत्पादनांच्या प्रक्रिया, साठवणूक व वितरणाशी कंपनीचा व्यवसाय संबंधित आहे. दरम्यान, गोदामाला आग नेमकी कशामुळे लागली, आगीचे क्षेत्र किती मोठे आहे आणि किती आर्थिक नुकसान झाले, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग पूर्णपणे विझविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
औद्योगिक गोदामांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सानपाडा येथील या घटनेमुळे औद्योगिक परिसरातील गोदामांमध्ये ज्वलनशील पदार्थांची साठवणूक, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि आपत्कालीन उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा गोदामांचे नियमित फायर ऑडिट होते का, अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे का आणि सुरक्षा नियमांचे पालन केले जाते का, याची संबंधित प्रशासनाने तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
गोदामात तेलाचे ड्रम आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीचा मोठा भडका उडाला असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. आगीदरम्यान मोठ्या आवाजाचे स्फोट होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या परिसरात इतरही अनेक औद्योगिक कंपन्या आणि गोदामे असल्याने आग शेजारील आस्थापनांपर्यंत पसरू नये म्हणून काळजी घेतली जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मोठे नुकसान होण्याची शक्यता
सप्तशृंगी ऑइल कंपनी खाद्यतेल, डाळी आणि इतर कृषी उत्पादनांची साठवणूक व प्रक्रिया करते. गोदामातील खाद्यतेलाचे ड्रम, कच्चा माल आणि पॅकेजिंग साहित्याने पेट घेतल्याने साठ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. गोदामातील प्रक्रिया यंत्रसामग्री आणि इमारतीच्या संरचनेलाही आगीची मोठी झळ बसली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर आणि ‘कुलिंग ऑपरेशन’ पूर्ण झाल्यावरच प्रशासन आणि कंपनीकडून नुकसानीचे नेमके मूल्यमापन (पंचनामा) केले जाईल.