७१८ लसीकरण केंद्रांवर बालकांना पोलिओ डोस
२३ ते २८ नोव्हेंबरदरम्यान घरोघरी लसीकरण
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत शहरात ७१८ लसीकरण केंद्रे उभारण्यात आली होती. दिवसभरात लसीकरणाचे ८३ टक्के उद्दिष्ट साध्य झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
महापालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून ६१७ स्थायी, ७४ ट्रान्झिट आणि २७ फिरती मोबाईल लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. खासगी दवाखाने, सोसायटी कार्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस डेपो, बाजारपेठा आणि मॉल अशा विविध ठिकाणी ही केंद्रे उभारण्यात आली होती. पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना केंद्रांवर आणून पोलिओचे डोस पाजले.
नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी कुकशेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन बालकांना पोलिओ डोस पाजले. यावेळी आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे यांच्यासह अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ या घोषवाक्याच्या माध्यमातून महापालिकेने घरोघरी जनजागृती केली होती. आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी पालकांपर्यंत मोहिमेची माहिती पोहोचवून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
दरम्यान, पल्स पोलिओ मोहिमेच्या जनजागृतीसाठी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभाग आणि रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई हिलसाईड यांच्या संयुक्त विद्यमाने सीबीडी बेलापूर ते ऐरोलीदरम्यान कार रॅली काढण्यात आली. या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
घरोघरी जाऊन लसीकरणाचे नियोजन
शहरातील एकही पात्र बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये, यासाठी २३ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. रविवारी लसीकरण केंद्रांवर येऊ न शकलेल्या बालकांना आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरीच पोलिओ डोस देण्यात येणार आहेत. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ आणि महापालिका आरोग्य विभागाने केले आहे.