नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर पंढरपूर परिसर स्वच्छ व आरोग्यदायी रहावा यादृष्टीने महापौर सुजाताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महापालिकेच्या विशेष स्वच्छता पथकाने आषाढी एकादशीप्रमाणेच पंढरपूर नगरीत स्वच्छता सेवा बजावली.
या विशेष पथकामध्ये प्रमुख स्वच्छता निरीक्षक लवेश पाटील, नवनाथ ठोंबरे व विजय नाईक यांनी एक सक्शन वाहन, एक घंटागाडी आणि ३० स्वच्छतादूतांसह सखोल स्वच्छता मोहीम राबविली.
या विशेष पथकाने १९ ते २१ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पंढरपूर येथे विठ्ठल मंदिर परिसर, बाजारपेठ परिसर, चंद्रभागा नदीवरील उड्डाणपूल, पासष्ट एकर समोरील मैदान, मुख्य रस्ता (तीन रस्ता चौक) आदी विविध ठिकाणी साफसफाई करून पंढरपूर स्वच्छतेत अनमोल योगदान दिले. यामध्ये विशेषत्वाने चंद्रभागा नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली व भाविकांसाठी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. या स्वच्छता मोहीमेत सर्व स्वच्छतादूतांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला व पंढरपूर शहर स्वच्छ, सुरक्षित व रोगमुक्त ठेवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य केले.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी प्रमाणेच कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमातून स्वच्छतेची परंपरा कायम राखत नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.