स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
मुंबई : देशातील सर्वोत्कृष्ट राज्य सहकारी बँक या बहुमानाबरोबरच देशातील सहकारी बँकिंग क्षेत्रात राज्य सहकारी बँकेने आपल्या उत्कृष्ट कार्याची आणि तांत्रिक क्षमतेची पुन्हा एकदा प्रभावी छाप उमटवली आहे.
नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथील हॉटेल अशोकामध्ये पार पाडलेल्या `एक्सलन्स अॅवॉर्डस् २०२६’ या सोहळ्यात `एक्सलन्स इन सायबर सिक्युरीटी’ हा पुरस्कार राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी फिनान्शीयल सर्व्हिसेस इन्स्टीट्युशन्स ब्युरोचे सदस्य सतीश मराठे, नॅफस्कॉबचे अध्यक्ष लक्ष्मीदास, इंडियन को-ऑपरेटीव्हचे अजय झा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने सायबर अॅटॅकचा धोका ओळखून राज्यातील सर्व सहकारी बँकांना मोफत सेवा पुरविण्याच्या उद्देशाने वाशी येथे देशातील सर्वोत्तम सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभारले असून नाबार्डचे वरिष्ठ मुख्य महाव्यवस्थापक मणीकुमार सिवरामकृष्णन यांनी देशा-विदेशातील अशा प्रकारच्या सेंटर्सच्या तुलनेत राज्य बँकेचे सेंटर हे अत्यंत आधुनिक असल्याचे गौरवोद्गार काढत बँकेचे कौतुक केले आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने `शिखर बँक’ या नात्याने सहकारी बँकिंगचे पालकत्व स्वीकारत असताना व्यवसायातील उत्कृष्टता आणि सायबर सुरक्षेतील तांत्रिक नेतृत्व या दोन्ही क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मिळविलेला हा सन्मान म्हणजे राज्याच्या सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. सहकार क्षेत्रातील वित्तीय संस्थांना आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित बँकिंग आणि सक्षम डिजीटल पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या बँकेच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
या सायबर सिक्युरीटीचा लाभ घेण्यास सहकारी बँकांनी सुरुवात केली असून, काही जिल्हा बँका व नागरी बँकांनी सदर सेवेचा लाभ घेण्यास यापूर्वीच सुरुवात केली असून, सर्व जिल्हा बँकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याच्या सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी यापूर्वीच सहकारी बँकांना केले आहे.