स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई: घणसोली परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) आणि सिडको यांनी १६ नोव्हेंबर रोजी संयुक्त तोडक कारवाई केली. या कारवाईमुळे तब्बल ५४ कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले असून, या संकटाच्या काळात नगरसेवक किशोर पाटकर यांनी बाधित कुटुंबांना एकूण १३ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे.
घणसोली भागात काही विकसकांकडून बेकायदेशीर बांधकामे सुरू होती. याप्रकरणी नवी मुंबई महानगरपालिकेने संबंधित विकसकांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या नोटिसांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून विकसकांनी बांधकाम सुरूच ठेवले. अखेर या बेकायदेशीर बांधकामांवर आळा घालण्यासाठी मनपा आणि सिडको प्रशासनाने १६ नोव्हेंबर रोजी संयुक्तपणे धडक कारवाई करत ही बांधकामे जमीनदोस्त केली.
प्रशासनाच्या या कारवाईत कोणतीही चूक नसताना ५४ सर्वसामान्य कुटुंबांना आपले घर गमवावे लागले आणि त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली. ऐनवेळी डोक्यावरचे छत हिरावले गेल्याने या कुटुंबांची मोठी फरफट सुरू झाली होती. बाधित कुटुंबांची ही विदारक अवस्था पाहून किशोर पाटकर त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले.
पाटकर यांनी या ५४ बाधित कुटुंबांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण १३.५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची आणि जीवनावश्यक वस्तूंची सोय करणे शक्य होणार आहे. या कठीण प्रसंगी प्रशासनानेही या कुटुंबांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
