स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक सोमनाथ शांताराम केकाण यांना महाराष्ट्र शासनाने विशेष आदेशाद्वारे ३१ मे २०२७ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत किंवा त्यांची उपसंचालकपदी नियुक्ती होईपर्यंत त्यांना सध्याच्या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. शासनाचा हा आदेश २५ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत बांधकाम परवानग्या व पुनर्विकास प्रकल्पांतील (वाशी सेक्टर-९ मधील नैवेद्य, अलबेला व अवनी गृहनिर्माण संस्था इ.) कथित अनियमिततेच्या आरोपांवरून केकाण यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्याचा आणि निलंबनाचा ठराव ३१ विरुद्ध २० मतांनी मंजूर करण्यात आला होता.
यानंतर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी राज्य शासनाने महापालिकेने मंजूर केलेला हा कारवाईचा ठराव तात्काळ प्रभावाने निलंबित (स्थगित) केला. शासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या १६ सप्टेंबर २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालात संबंधित बांधकाम परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रे देताना कोणतीही अनियमितता आढळली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेचे नवीन सभागृह जानेवारी २०२७ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर सातत्याने महासभेत सोमनाथ केकाण या नावावर अनेकदा चर्चा झालेली असून सत्ताधारी गटातील काहींनी केकाण या विषयावर महासभेतील बराच वेळ खर्ची घातला असून अनेकदा प्रतिष्ठेचा विषयही बनविला आहे.

