फेरतपासणीत ४० ते ६० टक्के अपंगत्व निघाले शून्य ते १० टक्के
बदली आणि शासकीय सवलतींच्या लाभांची चौकशी सुरू
जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
पुणे : दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांच्या आधारे बदली आणि शासकीय सवलतींचा लाभ घेतल्याच्या संशयावरून पुणे जिल्हा परिषद प्रशासनाने पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. संबंधित शिक्षकांच्या पूर्वीच्या प्रमाणपत्रांमध्ये १८ ते ६० टक्के दिव्यांगत्वाची नोंद होती. मात्र, वैद्यकीय फेरतपासणीत त्यांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण शून्य ते १० टक्क्यांदरम्यान आढळल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. या शिक्षकांनी यापूर्वी दिव्यांग संवर्गातून बदली किंवा अन्य शासकीय सवलतींचा लाभ घेतला होता का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
वैद्यकीय फेरतपासणीत तांदळी (ता. शिरूर) येथील कोमल जालिंदर शिरसाट यांचे पूर्वीचे ५२ टक्के दिव्यांगत्व शून्य टक्के आढळले. मुटकवाडी (ता. खेड) येथील अरुणा विजयकुमार तांबे यांचे प्रमाण ४२ टक्क्यांवरून एक टक्का झाले. दरस्तुरवाडी (ता. आंबेगाव) येथील मधुकर महादेव डोंगरे यांचे पूर्वीचे ६० टक्के दिव्यांगत्व आता १० टक्के नोंदविण्यात आले आहे.
तसेच शिंगवे (ता. आंबेगाव) येथील सुभाष संपतराव इंदोरे यांचे दिव्यांगत्व १८ टक्क्यांवरून आठ टक्क्यांवर आले, तर वडकीनाला (ता. हवेली) येथील वाजीदा बादशहा शेख यांचे पूर्वीचे ४५ टक्के दिव्यांगत्व फेरतपासणीत शून्य टक्के आढळले.
४० टक्के दिव्यांगत्वाची अट; लाभ घेतल्याची चौकशी
शासकीय नियमानुसार दिव्यांग संवर्गातील विशेष सवलती आणि लाभ मिळविण्यासाठी किमान ४० टक्के दिव्यांगत्व असणे आवश्यक आहे. मात्र, फेरतपासणीत संबंधित पाचही शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण या मर्यादेपेक्षा कमी आढळले आहे. त्यामुळे त्यांनी पूर्वी कोणत्या आधारावर दिव्यांग संवर्गातून बदली मिळविली किंवा अन्य शासकीय सवलतींचा लाभ घेतला, याची तपासणी केली जात आहे.
४०९ शिक्षकांची प्रमाणपत्रे तपासणीच्या फेऱ्यात
पुणे जिल्ह्यात शिक्षकांच्या बदली प्रक्रियेदरम्यान तब्बल ४०९ शिक्षकांनी दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली होती. या प्रमाणपत्रांच्या आधारे बदली मिळविण्यात गैरप्रकार झाल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात १७६ प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४६ प्रमाणपत्रे बोगस असल्याचे आढळले होते. त्यानंतर संबंधितांपैकी ४१ शिक्षकांचे सेवा-सुविधांचे लाभ काढून घेण्यात आले आहेत.
आता वैद्यकीय फेरतपासणीत आणखी पाच शिक्षकांचे दिव्यांगत्वाचे प्रमाण अत्यल्प आढळल्याने प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय सवलतींचा गैरवापर झाला आहे का, याचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशीचा वेग वाढविला आहे.
वस्तूस्थिती व फरक
निलंबित झालेले ५ शिक्षक आणि तपासणीतील बदल
- कोमल शिरसाट (तांदळी, ता. शिरूर): पूर्वी ५२ टक्के नोंद — सद्य तपासणीत ० टक्के.
- अरुणा तांबे (मुडकेवाडी, ता. खेड): पूर्वी ४२ टक्के नोंद — सद्य तपासणीत ९ टक्के.
- मधुकर ठोंगिरे (दस्तूरवाडी, ता. आंबेगाव): पूर्वी ६० टक्के नोंद — सद्य तपासणीत १० टक्के.
- सुभाष इंदोरे (शिंगवे, ता. आंबेगाव): पूर्वी १८ टक्के नोंद — सद्य तपासणीत ८ टक्के.
- वाजेदा शेख (वडकी नाला, ता. हवेली): पूर्वी ४५ टक्के नोंद — सद्य तपासणीत ० टक्के.
