हिंगोलीत १,४७५ जणांचा भाजपमध्ये प्रवेश; मुंबईत पदाधिकाऱ्यांची मनसेला पसंती
नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला राज्यात पक्षांतराचे धक्के बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील मंठा तालुक्यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख उदय बोराडे यांच्यासह तब्बल १ हजार ४७५ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे, मुंबईतील विमानतळ परिसरातील काही कामगार आणि ओला-उबर चालकांनी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केल्याने शिंदे गटाला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यातील मंठा शहरात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या कथित एकाधिकारशाहीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. या पक्षप्रवेशामुळे मंठा तालुक्यात शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीला मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या सोहळ्यात उदय बोराडे यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्तीही करण्यात आली. यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी मंठा तालुक्यात भाजपची ताकद वाढल्याचा दावा केला. मतदारसंघातील शिंदे गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये आणल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.
दरम्यान, मुंबईतील विमानतळ परिसरातही शिंदे गटाला पक्षांतराचा फटका बसल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केलेल्या ओला-उबर चालकांसह विविध कामगारांनी पुन्हा मनसेत प्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे विमानतळ परिसरात मनसेची संघटनात्मक ताकद वाढल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
हिंगोलीतील मोठ्या संख्येतील पक्षांतर आणि मुंबईतील कामगारांच्या घरवापसीमुळे शिंदे यांच्या शिवसेनेसमोर संघटनात्मक ताकद टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतरांचा पक्षाच्या स्थानिक संघटनांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
