१ डिसेंबरला उरण तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; आमदारकी रद्द करण्याची शासनाकडे मागणी
नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
उरण : उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांना न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांच्या आमदारकीचा मुद्दा राजकीय पटलावर चांगलाच तापला आहे. बालदी यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करून त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मागणीसाठी येत्या १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता उरणमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.
उरण शहरातील कामठा रोडवरील हॉटेल शामियाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मोर्चाद्वारे तहसीलदारांना निवेदन देऊन ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन आणि विधानसभा सचिवांकडे पाठविण्यात येणार आहे. आमदार महेश बालदी यांना अपात्र घोषित करण्यासाठी शासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
२०१० मधील मयूर घरत मारहाण प्रकरणात अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १९ नोव्हेंबर रोजी आमदार महेश बालदी यांच्यासह चार जणांना दोषी ठरवून तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर करून वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी दिली आहे. या निकालामुळे बालदी यांच्या आमदारकीच्या पात्रतेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
पत्रकार परिषदेत उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. मयूर घरत यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि भविष्यात कोणत्याही महिला किंवा भगिनीचा अपमान होऊ नये, यासाठी महाविकास आघाडी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. २०१० पासून मयूर घरत यांनी न्यायासाठी पाठपुरावा केला असून न्यायालयाचा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनीही या प्रकरणाच्या अनुषंगाने स्वतंत्र याचिका दाखल केल्याची माहिती दिली. त्याचा निकाल आगामी सहा महिन्यांत अपेक्षित असल्याचे सांगत महिलांचा अपमान करणाऱ्या लोकप्रतिनिधीविरोधात आवाज उठविण्यासाठी १ डिसेंबरचा मोर्चा आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांनी न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत आमदार महेश बालदी यांच्यावर टीका केली. न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही काही समर्थकांकडून त्यांचे समर्थन करणारे संदेश प्रसारित केले जात असल्याबद्दल त्यांनी आक्षेप नोंदविला. चुकीच्या कृत्याला राजकीय पाठबळ मिळता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांनीही या वेळी आपली भूमिका स्पष्ट केली.
या पत्रकार परिषदेला नगराध्यक्षा भावना घाणेकर, मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील, पंचायत समिती सदस्य दीपक भोईर, कामगार नेते कॉ. भूषण पाटील, रवी घरत, शेकापच्या रायगड जिल्हा सरचिटणीस तेजस्विनी घरत, सुधाकर पाटील, संतोष ठाकूर, राजेश केणी, आशिष गोवारी यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
१ डिसेंबरचा मोर्चा हा केवळ राजकीय निषेध न राहता आमदारांच्या अपात्रतेच्या मागणीसाठी शासनदरबारी आवाज पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले. आता या मागणीवर शासन आणि विधानसभा प्रशासन काय भूमिका घेते, याकडे उरणच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
