लाखो भाविकांसाठी रस्ते, पायऱ्यांचे रुंदीकरण, रेलिंग आणि स्वच्छतागृहांची सुविधा उभारण्याचे नियोजन
नवी मुंबई लाईव्ह वृत्तसेवा : Navimumbailive.com@gmail.com
संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००
नवी मुंबई : श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक सुरक्षित, सुखकर आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित विकासकामांना गती देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सुजाताताई पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वनविभागाच्या परवानगीअभावी अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली होती. सर्व कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींची तपासणी करून आवश्यक जागेसाठी परवानगी देण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्याच अनुषंगाने महापौर सुजाताताई पाटील यांनी देवस्थान समिती आणि संबंधित शासकीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेत स्थळपाहणी केली.
यावेळी पायथा मंदिर ते वाहनतळ या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती, वाहनतळ ते मंदिरापर्यंतच्या पायऱ्यांचे रुंदीकरण, पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना सुरक्षिततेसाठी रेलिंग बसविणे, तसेच पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारणे या महत्त्वपूर्ण कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या विकासकामांसाठी वनविभागासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्यात समन्वय साधण्यावर भर देण्यात आला. आवश्यक परवानग्या आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पाहणीवेळी आमदार सुनील शेळके, ‘ब’ प्रभाग समिती सभापती तथा नगरसेविका रुपाली भगत, नगरसेविका शुभांगी पाटील, ‘फ’ प्रभाग समिती सभापती तथा नगरसेविका ललिता मढवी, वनविभाग व संबंधित विभागांचे अधिकारी तसेच श्री एकविरा देवी देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रस्तावित सुविधा प्रत्यक्षात साकारल्यास भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद भक्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

