* नेरूळ पोलीसांच्या स्वाधीन केल्या ४ वेश्या
अनंतकुमार गवई
नवी मुंबई : जुईनगर रेल्वे स्थानक व सभोवतालचा परिसर वेश्या व्यवसायापासून मुक्त करण्याचा जुईनगरच्या शिवसैनिकांनी चंगच केला असून बुधवारी (दि. २१) रात्री पुन्हा शिवसैनिकांनी जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या महिला व्यवसायावर हल्लाबोल चढवित चार वेश्यांची धरपकड करत त्यांना नेरूळ पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
सोमवारीदेखील शिवसैनिकांनी वेश्याव्यवसाय करणार्या ८ महिलांची धरपकड करत त्यांना नेरूळ पोलीसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर पुन्हा ४८ तासाच्या आतच शिवसेना शाखाप्रमुख शैलेश भोईर यांच्यासह शिवसैनिकांनी जुईनगर रेल्वे स्थानकातील वेश्या व्यवसाय करणार्या महिलांवर पाळत ठेवून ४ महिलांना बुधवारी रात्री पोलीसांच्या ताब्यात दिलेआहे.
जुईनगर रेल्वे स्थानक आवारात गेल्या काही महिन्यापासून खुलेआमपणे चालणारा वेश्याव्यवसाय शिवसैनिकांनी व शिवसेनेच्या रणरागिंणीनी पुढाकार घेवून उधळून लावला आहे बुधवारी रात्री पुन्हा एकवार उधळून लावला आहे. सोमवारी वेश्याव्यवसाय करणार्या ८ महिलांना नेरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. बुधवारी रात्री ज्या ४ महिलांची वेश्या व्यवसायप्रकरणी शिवसैनिकांनी धरपकड केली. त्यातील २ महिला या पूर्वीच्याच ८ महिलांमधील असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेरूळ पोलीसांच्या ताब्यात देवून अवघ्या ४८ तासाच्या आत संबंधित महिला पुन्हा जुईनगर रेल्वे स्थानकामध्ये वेश्या व्यवसायासाठी येण्याचे धाडस करतातच कशा, याबाबत नवी मुंबईकरांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात पूर्वेच्या बाजूला रिक्षा स्टॅण्ड परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून खुलेआमपणे वेश्या व्यवसाय सुरू होता. रेल्वे स्थानक जाणार्या व बाहेर येणार्या प्रवाशांना शुक शुक करून, अश्लिल इशारे करून, चित्रविचित्र चाळे करून तर कधी शरीराच्या भागाचे प्रदर्शन करून वेश्या व्यवसाय करणार्या महिला आकर्षित करून घेण्याचा प्रयास पूर्वीचाच प्रकार बुधवारी रात्रीदेखील करत असल्याचे शिवसैनिकांच्या निदर्शनास आले. जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात सकाळी ११ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यत वेश्या व्यवसाय करणार्या महिला उभ्या असलेल्या पहावयास मिळत. दुपारच्या वेळी मानखुर्द-गोवंडीच्या महिला तर रात्रीच्या वेळी तुर्भे व सभोवतालच्या परिसरात महिला वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती धरपकड केलेल्या महिलांनीच बुधवारी रात्री पुन्हा एकवार शिवसैनिकांनी केलेल्या चौकशीत दिली.
गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या या वेश्या व्यवसायामुळे अन्य रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणार्या महिलांनाही इतर लोकांच्या अश्लिल नजरांचा सामना करावा लागत असे. या त्रस्त महिलांनी शिवसेनेचे जुईनगरचे शाखाप्रमुख शैलेश भोईर यांच्याशी संपर्क साधल्यावर जुईनगर रेल्वे स्थानकात चालणारा वेश्या व्यवसाय उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
शाखाप्रमुख शैलेश भोईर, शाखाप्रमुख स्वानंद शिंदे, महिला आघाडीच्या उपशहरसंघठक संगीता शिंगाडे, विभाग संघठक सुनिता माने, शाखासंघठक नीता विसपुते यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी, शिवसैनिकांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या व्यूहरचनेत पुढाकार घेत जुईनगर रेल्वे स्थानक आवारात चालणारा वेश्या व्यवसाय पुन्हा एकवार बुधवारी रात्री उधळून लावला. ४ महिलांना घटनास्थळी पोलीस बोलावून नेरूळ पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. नेरूळ पोलीस ठाण्याचे एपीआय ढोम अधिक तपास करत आहे. शिवसैनिकांनी अवघ्या ४८ तासाच्या आतच पुन्हा एकवार वेश्या व्यवसाय उधळून लावल्याने जुईनगर-सानपाडा परिसरात दिवसभर याचीच चर्चा सुरू आहे. जुईनगर रेल्वे स्थानकातील चालणार्या वेश्याव्यवसायाबाबत पोलीसांची निष्क्रियता नवी मुंबईकरांमध्ये पुन्हा एकवार चर्चेचा बनली आहे.