सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : पामबीच मार्गालगत वाशी सेक्टर १७ परिसरात मार्गाला समांतर असणार्या नाल्याचे पाणी भरतीच्या काळात गेल्या चार दिवसापासून मार्गाच्यालगत येवू लागले आहे. या पाण्याचा ओलावा पामबीच मार्गावरही स्पष्टपणे दिसू लागला आहे. नजीकच्या काळात शक्य तितक्या लवकर नाल्याची खोली न वाढविल्यास नाल्यातील पाणी वाशी सेक्टर १७ परिसरात घुसण्याची भीती स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईतील सर्वाधिक मोठा नाला म्हणून या नाल्याची गणना केली जात आहे. तथापि पालिका प्रशासनाच्या कृप्पेने व राज्यकर्त्यांच्या उदासिनतेने नाल्याची जागा दिवसेंगणिक अरूंद होत चालल्याने येत्या काही दिवसात नाल्याचे पाणी वाशी सेक्टर १७ परिसरात पुन्हा एकवार घुसण्याची भीती परिसरातील रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
वाढत्या नागरीकरणाचा व वाढत्या लोकसंख्येचा विचार करता खाडीला जावून भेटणार्या नाल्याचे विस्तारीकरण होणे नवी मुंबईकरांना अपेक्षित होते. पण गेल्या काही वर्षात त्याउलट घडल्याने नाल्याच्या आकारमानात कपात होवून नाल्याभोवताली अतिक्रमणे वाढीस लागली आहे. पामबीच मार्गाकडून सायन-पनवेल पुलाखालुन पुढे गेल्यावर डावीकडे वळसा मारून सानपाड्याला जाता येते. त्याठिकाणी नाल्याचा आकार कमी करत मैदान करण्यात आले आहे. वाशीतून पामबीच मार्गे सानपाड्याला येताना नाल्यालगत गेल्या काही वर्षात टेम्पो स्टॅण्ड बनविण्यात आले आहे. पूर्वी त्या ठिकाणी टेम्पो स्टॅण्ड नव्हते. ते अलिकडच्या काळात बनविण्यात आले आहे.
सायन-पनवेल मार्गावरून पामबीच मार्गाकडे येताना उताराच्या दिशेने पाहिल्यास त्याही ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली नाल्याच्या आकारमानात कपात करून मैदानाची निर्मिती करताना नाल्याच्या आकारमानात कपात करण्यात आली आहे. नाल्याच्या चारही बाजूचे गेल्या काही वर्षातील छायाचित्रे व आताची परिस्थिती पाहिल्यास टेंम्पो स्ॅटण्डचे अतिक्रमण व नाल्यालगतच्या जागेचे सुशोभीकरण या नावाखाली नाल्याचे आकारमान कमी करण्यात आले आहे.
नाल्याच्या आकारमानाच्या वजावटीबाबत सर्वप्रथम धोका शिवसेनेचे नगरसेवक रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. तीन वर्षापूर्वी (२०१२)मार्च अखेरिस त्यांनी कोणत्याही क्षणी नाल्यातील पाणी पामबीच मार्गावर येवून वाशी सेक्टर १७ मध्ये पाणी घुसण्याचा इशारा दिला होता. नाल्याच्या आकारमानात घट करत असाल तर नाल्यातील सर्व तळापासून गाळ काढून नाल्याची खोली वाढविण्याची नगरसेवक मांडवे यांनी केली होती. महापालिका प्रशासनाने नगरसेवक मांडवेंच्या मागणीकडे कानाडोळा करत समस्येच्या गांभीर्यांकडे उदासिनता दाखविली. १९ एप्रिल २०१२ रोजी नाल्यातील पाणी भरदुपारी भरतीच्या काळात पामबीच मार्गावर येवून वाशी सेक्टर १७ परिसरात घुसले होते.
महापालिका प्रशासनाने नवी मुंबईतील सर्वाधिक मोठा असणार्या या नाल्याकडे सातत्याने कानाडोळा केला आहे. फक्त पावसाळा जवळ आल्यावर पावसाळीपूर्व कामाचा भाग म्हणून नाल्यात जेसीपी लावून साफसफाई करण्यापलिकडे फारसे काम केले नसल्याची नाराजी शिवसेना नगरसेवक रतन मांडवे यांनी वारंवार व्यक्त केली आहे.
जानेवारी महिन्याच्या मध्यावरच नाल्याचे पाणी भरतीच्या काळात पुन्हा एकवार पामबीच मार्गावर धडकू लागले आहे. पाण्याचा ओलावा पामबीच मार्गावर बेलापुरच्या दिशेने जाताना स्पष्टपणे पहावयास मिळत आहे. नाल्याची खोली न वाढविता केवळ जेसीपीने वरवरचा कचरा काढल्यास यंदाच्या पावसाळ्यात वाशी सेक्टर १७ जलमय होण्याची भीती स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.