* कबड्डी, खो-खो, शालेय क्रिकेट स्पर्धांची रेलचेल
नवी मुंबई : जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई क्रीडा महोत्सव(खो-खो,कबड्डी आणि क्रिकेट) यंदा २९,३० आणि ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत संपन्न होणार आहे, अशी माहिती या महोत्सवाचे आयोजक आमदार संदीप नाईक यांनी दिली. या क्रीडा महोत्सवाचा शानदार उद्घाटन सोहळा कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक शाळेच्या मैदानावर २९ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता लोकनेते श्री.गणेश नाईक यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्याला ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक, महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबईच्या शालेय विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना एक भरभक्कम व्यासपिठ मिळवून देण्यासाठी लोकनेते गणेश नाईक यांनी १९८९ साली नवी मुंबई क्रीडा संकुलाची स्थापना केली. विविध क्रीडा विषयी उपक्रम राबवितानाच १९९२ सालापासून या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आमदार चषक क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली.
२००८ सालापासून आमदार संदीप नाईक यांनी या नवी मुंबई क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहित केले आहे. त्यामुळेच दरवर्षी या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद अधिकच वाढतो आहे. यावर्षी होणार्या क्रीडा महोत्सवात १०० शाळांमधील साधारणत: २३० संघ आणि विविध स्तरातील खेळाडू आपल्या क्रीडाविषयक क्षमता या महोत्सवात दाखवून देणार आहेत.
या वर्षी शालेय विद्यार्थ्यांकरीता कबडडी, खो-खो आणि क्रिकेट या तीन खेळांचा या महोत्सवात समावेश करण्यात आला आहे. कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर कबडडी आणि खो-खोचे सामने पार पडणार आहेत. नेरुळ येथील सेक्टर-१२ मध्ये असलेल्या रामलीला मैदान आणि तेरणा हायस्कूल मैदान अशा दोन मैदानांवर क्रिकेटचे सामने रंगणार आहेत.
उदघाटनप्रसंगी महोत्सवात विविध शाळेतील खेळाडू संचलन करुन पाहुण्यांना सलामी देतील. यानंतर क्रीडा शपथ घेतली जाईल. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा उद्घाटनाचा सोहळा रंगणार आहे. महोत्सवाचा बक्षिस समांरंभ ३१ जानेवारी रोजी कौपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयात सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रोख रक्कमेची आकर्षक पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
क्रीडा नगरी म्हणून नवी मुंबईचा लौकीक निर्माण झाला आहे. यामध्ये नवी मुंबई क्रीडा महोत्सवासारख्या उपक्रमांचा मोठा वाटा आहे. आतापर्यतच्या महोत्सवात कौशल्य दाखविणार्या अनेक खेळाडूंनी पुढे जाऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नवी मुंबईची लौकिकता वाढवली आहे. देशासाठी पदकांची कमाई केली आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील या क्रीडा महोत्सवातून नवी मुंबईतील उगवत्या खेळाडूंची गुणवत्ता समोर येईल, असा मला विश्वास आहे.
– आमदार संदीप नाईक, आयोजक
* खेेळांचे प्रकार आणि सहभागी वयोगट
* कबड्डी: १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १७ वर्षांखालील,
* खो-खो़: १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील आणि १७ वर्षांखालील
* क्रिकेट : इयत्ता १ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे संघ