सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : मागील वर्षी तुफान यशस्वी झालेला‘जीवनधारा’ प्रस्तुत नवी मुंबईतील दुसरा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव यावर्षी रविवारी २५ जानेवारी रोजी कोपरखैरणे सेक्टर २३ मधील निसर्ग उद्यानात सकाळी ९ ते सायंकाळी ७.३० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
नवी मुंबई कला व क्रीडा संकुल आणि नवी मुंबई साहित्य व सांस्कृतिक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव पार पडणार असून त्यामध्ये सहभागी होणार्या सर्वाना मोफत प्रवेश आहे. तसेच पतंग देखील मोफत पुरविण्यात येणार आहेत. महापौर सागर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव भरविण्यात आला आहे. लोकनेते गणेश नाईक, ज्ञानेश्वर नाईक, संजीव नाईक, आ. संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे.
‘विकासाच्या मुक्त आभाळी, पतंगासारखी घेऊया भरारी’ हे या वर्षीच्या पतंग महोत्सवाचे ब्रीदवाक्य आहे. या महोत्सवामध्ये विविध आकाराच्या आणि आकर्षक पतंगबाजीचे दर्शन नवी मुंबईकरांना होणार आहे. जम्बो पतंग, कार्टून पतंग, स्टंट पतंग आकाशी पाहावयास मिळणार आहे. याशिवाय रंगतदार आणि उत्कंठावर्धक अशा पतंग स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. अबालवृध्दांच्या पतंग विषयक कलात्मकतेला संधी देण्यासाठी या महोत्सवामध्ये पतंग बनविणे आणि पतंग रंगविणे याचे देखील एक सत्र असणार आहे. या महोत्सवामध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार नवी मुंबईकरांचा उत्साह वाढविण्यासाठी येणार असून यामध्ये आघाडीचा अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि इतर अभिनेते, अभिनेत्रींंचा सहभाग राहणार आहे.
चौकट
* एलईडी पतंग खास आकर्षण एलईडी पतंग खास आकर्षण
‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव २०१५’ मध्ये भारतातील विविध राज्यांतून अनेक पतंगप्रेमींनी सहभाग नोंदविला आहे. या पतंग महोत्सवाचे खास आकर्षण ‘एलईडी लाईट पतंग’ ठरणार आहे. नवी मुंबईत प्रथमच अशा प्रकारचे पतंग आकाशाला गवसणी घालणार आहेत. त्याचप्रमाणे कोबरा काईट, रोकाकू काईट, डेल्टा काईट, बर्ड काईट, ईगल काईट, क्रॉक काईट, ट्रेन काईट असे विविध पतंग गगनाला भिडणार आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे काईट फ्लायर दिलीप कपाडिया, दीपक कपाडिया, अब्दुल रौस, हितेश रमानिया, पियुश खारवा आदींचा या महोत्सवात सहभाग आहे.