सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवाराला व सभोवतालच्या परिसराला पायाभूत सुविधा पुरविण्यास नवी मुंबई महापालिका प्रशासनाने सातत्याने उदासिनताच दाखविलेली आहे. बाजार समिती आवारातील किराणा दुकान मार्केटलगत असणार्या पदपथाला आलेला बकालपणा व पादचार्यांना वापरण्यायोग्य नसलेले पदपथ बाजार समिती आवाराला गलिच्छपणाचा विळखा पडल्याचे दाखवून देत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई कार्यान्वित झाल्यापासून नवी मुंबई शहराच्या नागरीकरणाला व अर्थकारणाला खर्या अर्थांने गती मिळालेली आहे. महापालिका स्थापनेनंतर बाजार समिती आवाराकडे महापालिकेने सुविधा पुरविण्याकडे सातत्याने कानाडोळाच केला आहे. देश-परदेशातून येणारे शिष्टमंडळ बाजार समिती आवारातील कृषी बाजारपेठांची पाहणी करण्यासाठी नेहमीच येत असतात. या मार्केटमधून त्या मार्केटमध्ये जाताना पदपथ पाहिल्यावर नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या नागरी सुविधांची उडालेली लक्तरे त्यांना स्पष्टपणे पहावयास मिळतात.
किराणा दुकाना मार्केटच्या जावक गेटमधून बाहेर पडल्यावर एका दिशेला आपणास कांदा बटाटा मार्केटकडे जाता येते, तर दुसर्या बाजूला आरटीओ कार्यालयाकडे जाता येते. समोरच वाहन तळ आहे. किराणा दुकान मार्केटच्या जावकगेटवरील पदपथ आजमितीला केवळ अस्तित्वापुरतेच राहीले आहेत. या पदपथावरील दुर्गंधी, बकालपणा, अतिक्रमणे पाहिल्यावर हे पदपथ पादचार्यांना चालण्याच्याही लायकीचे राहीले नसल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळते. पदपथाच्या बाजूलाच मनपाच्या कृप्पेने ‘पे ऍण्ड पार्किग’च्या सौजन्याने ट्रक मोठ्या संख्येने उभे राहत असल्याने पदपथ झाकाळले गेले आहेत. ट्रकचालकांचाच संचार या पदपथावर असतो. ट्रकच्या आडून पदपथावरून दिवसाउजेडी चालण्यास एकटीदुकटी महिलादेखील साहस करणार नाहीत. पदपथ ठिकठिकाणी उखडले गेले असून गटारांवरील झाकणेही गायब झाली आहे. पदपथावरच खुलेआमपणे लघुशंका ठिकठिकाणी केली जात आहे. पदपथावरील पेव्हर ब्लॉकही उखडले गेले आहेत. पदपथावरच ट्रक रिपेरिंगही केली जात असल्याचे पदपथाला काही प्रमाणात गॅरेजचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पदपथावर तुटलेल्या कचराकुंड्या टाकण्यात आल्या असून ठिकठिकाणी कचराही विखुरलेला पहावयास मिळत आहे.
नवी मुंबईचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बाजार समिती आवारालगतच्या पदपथाची पाहणी केल्यास महापालिकेला कर देणार्या बाजार समितीला महापालिका काय सुविधा देते याची शहनिशा करता येईल अशी प्रतिक्रिया बाजार समिती आवारातील व्यापार्यांकडून व्यक्त केली जात आहे.