सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला माघी गणेशोत्सव उत्साहात आणि भाविकांच्या जल्लोषात साजरा करण्यात आला. मनसेमय वातावरणात भाविकांच्या मांदियाळीत संस्कृती जोपासणारा आगळावेगळा गणेशोत्सव नेरूळमधील भाविकांमध्ये आकर्षणाचा व श्रध्देचा विषय ठरला.
मनविसेच्या सांस्कृतिक विभागाने नेरूळ सेक्टर १० परिसरात माघी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा केला. स्थानिक भागातील राजगर्जना सामाजिक प्रतिष्ठान आणि राजगर्जना सामाजिक महिला मंडळ यांच्या माध्यमातून हा गणेशोत्सव आयोजित करण्यात आला. मनविसे सांस्कृतिक विभागाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, अर्जुन चव्हाण, चेतन खैरनार, उमेश वेताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
मनविसेच्या सांस्कृतिक विभागाने यंदा प्रथमच सार्वजनिकरित्या सुरू केलेल्या माघी गणेशोत्सवात २३ जानेवारीला सकाळी १० वाजता मंडपात श्रीची मूर्ती विराजमान झाल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले. मनसेच्या महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा श्रेया सुधीर यांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू समारंभ झाला. यामध्ये महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन श्रेया सुधीर यांनी यशस्वीपणे केले. यामध्ये ९०० हून अधिक महिला सहभागी झाल्याची माहिती अर्जुन चव्हाण यांनी दिली.
मनसेचे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे, महिला आघाडीच्या उपाध्यक्षा आरती धुमाळ, शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक दिलीप घोडेकर, नेरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता शिंदे-अल्फान्सिसो यांच्यासह शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक पातळीवरील रहीवाशांनी मोठ्या संख्येने गणेश दर्शनाचा लाभ घेतला. शनिवारी, दि. २४ जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जुईनगरमधील चिंचोली तलावात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन यात्रेतही मनविसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.