सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : राज्याच्या सहकारक्षेत्राचा कणा मानल्या जाणार्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरक्षा व्यवस्था म्हणजे ‘बडा घर आणि पोकळ वासा’ बनली आहे. बाजार समिती सचिवांची हत्या असो वा कृषी मालाची चोरी येनकेनप्रकारे बाजार समिती आवाराच्या सुरक्षाव्यवस्थेची लक्तरे वेशीवरच मांडलेली पहावयास मिळतात. बाजार समिती आवारातील दाणाबंदरची पाहणी केल्यास ठिकठिकाणी तुटलेल्या संरक्षक भिंती भुरट्या चोरांना निमत्रंण देत असल्याची कडवट नाराजी बाजार आवारातील घटकांकडून व्यक्त केली जात आहे.
बाजार समिती आवारातील दाणा बंदर हे एक महत्वपूर्ण मार्केट. अन्य बाजारांच्या तुलनेत या मार्केटमधील आर्थिक उलाढाल ही नेहमीच लक्षणीय राहीलेली आहे. या मार्केटमध्ये नेहमीच चोर्या होत असल्याने मार्केटच्या सुरक्षा व्यवस्थेवर कायमच फार पूर्वीपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बाजार समिती प्रशासनाने दाणाबंदरच्या सुरक्षा व्यवस्थेला वार्यावरच सोडल्याने तुटलेल्या संरक्षक भिंतीबाबत गेल्या काही वर्षात ठोस निर्णय घेतला जात नाही. एपीएमसी पोलीस स्टेशनच्या विरूध्द दिशेने दाणाबंदरच्या संरक्षक भिंतीची पाहणी करत कोपरीच्या दिशेने चालत गेल्यास दाणा बंदरच्या संरक्षक भितींची दुर्रावस्था ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. किमान १२ ते १३ ठिकाणी दाणा बंदरच्या संरक्षक भिंतीला भगदाड पडलेले आहे. या भगदाडामधून भुरटे चोर बाराही महिने २४ तास कधीही ये-जा करू शकतात. गेट क्रमांक ५ च्या प्रवेशद्वाराचेही काम संथगतीने सुरू असून प्रवेशद्वारालगतही भिंत बर्याच अंतरावर तुटलेली आहे. गेट क्रमांक ६च्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून हा गेटही तुटलेला आहे.
दाणा बंदर मार्केटमधील अर्थकारण व धान्य साठ्याचा मुबलक प्रमाण हे नेहमीच गेल्या काही वर्षात नेहमीच भुरट्या चोरांना आकर्षणाचा विषय राहीला आहे. दाणा बंदरच्या तुटलेल्या संरक्षक भिंतीच्या डागडूजीबाबत बाजार समिती प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने दाणा बंदरमधील मालमत्तेला सदोदीत भुरट्या चोरांकडून धोका असल्याची नाराजी बाजार आवारातील घटकांकडून व्यक्त केली जात आहे. गर्दुले, भिक्षेकरी तुटलेल्या संरक्षक भिंतीच्या माध्यमातून दाणा बंदरमध्ये रात्री-अपरात्री ये-जा करत असतात.
दाणाबंदरच्या संरक्षक भिंती तुटलेल्या असतानाही येथील सुरक्षा व्यवस्थेकडे आणि भिंतीच्या डागडूजीकडे बाजार समिती प्रशासन कानाडोळा करत असल्याचा संताप बाजार आवारातील घटकांकडून व्यक्त केला जात आहे.