सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवार आणि सभोवतालच्या परिसराकडे नागरी सुविधा न पुरविण्याची परंपरा नवी मुंबई महापालिकेने आजही कायमच ठेवल्याचे दाणाबंदर मार्केटच्या पदपथांकडे पाहिल्यावर पहावयास मिळते. दाणाबंदर मार्केटचे एपीएमसी पोलीस स्टेशनच्या विरूध्द दिशेने थेट कोपरीपर्यत दाणाबंदरलगतच्या पदपथावरून गेल्यास मुतारीची दुर्गंध, पदपथावर भंगारात पडलेली वाहने, रॅबिट, उघडी गटारे, अस्ताव्यस्त विखुरलेला कचरा आदी बकालपणाच्या व दुर्गंधीच्या विळख्यात हे पदपथ अडकलेले पहावयास मिळत आहे.
नवी मुंबई शहरात बाजार समितीचे आगमन झाल्यानंतर नवी मुंबई शहराच्या नागरीकरणात व अर्थकारणात झपाट्याने बदल होत गेला. पण महापालिका प्रशासनाने स्थापनेनंतर बाजार समिती आवारातील आतील व बाहेरील भागाकडे कानाडोळाच केला असल्याची नाराजी बाजार समिती आवारातील घटकांकडून वारंवार उघडपणे व्यक्त केली जावू लागली आहे. बाजार समिती आवाराबाहेरील विविध मार्केटच्या संरक्षक भिंतीलगतचे पदपथ पाहिल्यावर हे पदपथ पादचार्यांना चालण्याच्यादेखील लायकीचे राहीले नसल्याचे पहावयास मिळत आहे. बाजार समिती आवारातील दाणा बंदर मार्केटच्या संरक्षक भिंतीलगतचे पदपथ पाहिल्यावर या पदपथावरून पादचार्यांना चालणेही अवघड होवून बसले आहे. या पदपथाचा अधिकांश भाग लघुशंकेसाठीच वापरला जात असल्याचे दिवसाउजेडीही पहावयास मिळत आहे.
पदपथावरील पेव्हर ब्लॉक ठिकठिकाणी उखडले गेले आहेत. पदपथावर कचर्याचे व डेब्रिजचे ढिगारे ठिकठिकाणी विखुरले गेले आहे. गटारावरील झाकणेही नाहीशी झाली असून खुली गटारे दुर्गंधीला व अपघातांना निमत्रंण देत आहेत. या पदपथावर एपीएमसी पोलीसांनीदेखील केलेल्या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासन कानाडोळाच करत आहे. एपीएमसी पोलीस ठाण्यात अपघात वा चोरीप्रकरणी जमा करण्यात आलेली चारचाकी छोटी वाहनेदेखील या पदपथावरच उभी करून ठेवण्यात आलेली आहेत. ही वाहने आता भंगारात गेली असून पदपथाचा बराचसा भाग पोलिसांच्या या भंगारातील वाहनांनी व्यापलेला आहे. संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात नवी मुंबई महापालिकेला राज्यात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार देणार्यांनी यापुढे किमान बाजार समिती आवारातील मार्केटलगतच्या पदपथांची व तेथील बकालपणाची, दुर्गंधीची पाहणी करावी अशी संतप्त प्रतिक्रिया बाजार आवारातील घटकांकडून व्यक्त केली जात आहे.