* नवी मुंबई क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ
नवी मुंबई : सकाळच्या कोवळ्या उन्हात क्रीडा ध्वज आणि तेजोमयी सुर्य किरणांना साक्षी मानत दीप्र ज्वलन करुन क्रीडा शपथ घेत त्याचबरोबरच नेत्रदीपक असा शालेय विद्यार्थ्यांचा लेझीमचा कला अविष्कार व संचलनाने मान्यवरांना सलामी देत जीवनधारा वॉर्ड सल्लागार समिती-क्रीडा आणि नवी मुंबई क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवी मुंबई क्रीडा महोत्सव-२०१५ चा(कबड्डी, खो-खो) गुरुवारी २९ जानेवारी रोजी कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक शाळेच्या भव्य पटांगणात जल्लोषात शुभारंभ लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.तर नेरुळ येथील रामलिला मैदानात होणार्या शालेय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आ.संदीप नाईक आणि महापौर सागर नाईक यांच्या शुभहस्ते करण्यात आला. लोकनेते गणेश नाईक यांनी क्रीडा महोत्सवाने तालुका, जिल्हा, राज्य आणि आंतरराष्ट ्रीय स्तरावरील अनेक खेळाडू आजवर घडविले असून जीवनधारांचा हा उपक्रम क्रीडेचा पाया असणार्या शालेय खेळाडूमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा असल्याचे गौरवोद्गार काढले.
या शानदार कोपरखैरणे येथील क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभ सोहळ्याला ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, क्रीडा महोत्सवाचे आयोजक आणि आमदार संदीप नाईक, महापौर सागर नाईक, कामगार नेते अशोक पोहेकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते अनंत सूतार त्याचबरोबर नवी मुंबईतील नगरसेवक, नगरसेविका, क्रीडाप्रेमी नागरिक, नवी मुंबईतील विविध शाळांचे शिक्षक, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना अभिवादन आणि तिमिरातू तेजाकडे नेणारी दीपज्योत प्रज्वलीत करुन क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण लोकनेते गणेश नाईक यांच्या करण्यात आले. शालेय खेळाडूंनी शिस्तीचे दर्शन करीत मान्यवरांनी संचलन करुन पाहुण्यांना सलामी दिली. तर रा.फ.नाईकच्या विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे आणि लयबध्द लेझीमचा कला अविष्कार सादर करुन सर्वांनाच मुग्ध केले.
यावर्षीच्या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो, क्रिकेट खेळात नवी मुंबईतील विविध १०० शाळांमधील साधारणत: २३० संघ आणि विविध स्तरातील खेळाडू क्रीडाविषयक प्राविण्य दाखविणार आहेत.
लोकनेते गणेश नाईक यांनी उपस्थित विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना खेळ हा ईषा निर्माण करणारा नसून तो स्पर्धा निर्माण करणारा असावा असे सांगत प्रत्येक खेळाडूने आपल्यातील जिद्द कायम ठेवल्या त्याला यश हे मिळतेच अशी भावना व्यक्त केली.जीवनधराच्या माध्यमातून कला, क्रीडा, पर्यावरण अशा २५ समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुरु असणारे काम हे समाधानी असल्याचे म्हणाले. क्रीडा कले बरोबरच योग साधना ही देखील शारिरीक बलासाठी आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्वाची असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून योग साधणेचे वर्ग सुरु करण्याचे महापौर सागर नाईक आणि शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर सोनावणे यांना सूचित केले.
क्रीडा महोत्सवाचे आयोजक आ.संदीप नाईक मार्गदर्शन करताना म्हणाले की, नवी मुंबईच्या शालेय विद्यार्थ्यामधील क्रीडा गुणांना एक भरभक्कम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकनेते गणेश नाईक यांनी १९८९ साली नवी मुंबई क्रीडा संकुलाची स्थापना केली.त्यामाध्यमातून विविध क्रीडाविषयक उपक्रम राबवितानाच १९९२ सालापासून क्रीडा संकुलाच्या माध्यमातून आमदार चषक क्रीडा स्पर्धांची सुरुवात झाली. २००८ सालापासून नवी मुंबई क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नवोदित खेळाडूं आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. दरवर्षी या महोत्सवाला मिळणारा प्रतिसाद हा वाढतच असून खो-खो, कबड्डी खेळात नवी मुंबईतील खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे. हीच या स्पर्धेची पोचपावती असल्याची भावना आ.नाईक यांनी व्यक्त केली. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेने नवी मुंबई जोडले गेले आहे.आगामी कालावधीतही अशा प्रकारचे उपक्रम प्रत्येक विभागवार आयोजित करण्याचा मानस आ.नाईक यांनी व्यक्त केला.