सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणिस व सिडकोचे माजी संचालक यांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भेटीगाठींचा कार्यक्रम सुरू केला असून नवी मुंबईमधील ऐरोली व बेलापुर दोन्ही विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्यांच्या घरी अथवा कार्यालयात जावून संपर्क साधत आहेत. शुक्रवारी दुपारी शिवसेनेचे नवी मुंबई उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखे यांच्या एपीएमसीमधील फळ मार्केटमधील कार्यालयात जावून सुसंवाद साधला.
शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये नामदेव भगत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नामदेव भगत हे कॉंगे्रसमध्ये प्रदेश सरचिटणिस व नवी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते. सिडकोवर अनेक वर्षे त्यांनी संचालक म्हणून काम केले आहे. आगरी-कोळी महोत्सव आणि आगरी-कोळी भवनाची निर्मिती तसेच जनसामान्यांतील भरीव योगदानामुळे नवी मुंबईतील मातब्बर राजकीय प्रस्थामध्ये नामदेव भगत यांची तुलना करण्यात येत आहे. कॉंग्रेसमध्ये कोणतीही राजकीय कौंटूबिक पार्श्वभूमी नसताना केवळ सर्वसामान्य गोरगरीब घरातील एक कार्यकर्ता म्हणून राजकारणाचा श्रीगणेशा गिरविणार्या नामदेव भगत यांनी प्रदेश सरचिटणिस पदापर्यत मजल मारली. सिडको संचालकपदावर काम केले. नवी मुंबईतील स्थानिकांची आठवण म्हणून आगरी-कोळी भवनाची निर्मिती करणे नामदेव भगत यांनी सिडकोला भाग पाडले.
विधानसभा निवडणूकीत पराभूत झाल्यावर निवडणूकीत पक्षविरोधी कारवाया करून पराभवास हातभार लावणार्यावर कारवाई करण्याची नामदेव भगत यांनी कॉंग्रेस श्रेष्ठींकडे मागणी केली होती. परंतु न्याय न मिळाल्याने वेगळी राजकीय चूल मांडण्याचा निर्णय घेत त्यांनी कॉंग्रेसला राम राम ठोकत शिवसेनेचा ‘जय महाराष्ट्र’ आपलासा केला.
शिवसेना प्रवेशानंतर नवी मुंबई शिवसेनेतील लहानमोठ्या सर्वच पदाधिकार्यांच्या भेटीगाठी घेवून सुसंवाद साधण्याचा एककलमी कार्यक्रम नामदेव भगत यांनी सुरू केला आहे. कालच महिला आघाडीच्या जिल्हा संघठक रंजना शिंत्रे यांचीही नामदेव भगत यांनी भेट घेतली. शुक्रवारी फळ मार्केटच्या कार्यालयात जावून उपजिल्हाप्रमुख ऍड. मनोहर गायखेंशी सुसंवाद साधला. मी कॉंग्रेस पक्षातील मातब्बर जरी असलो तरी शिवसेना संघटनेत मी नवीन सैनिक आहे. मला संघटना समजून-उमजून घेण्यासाठीच आपण प्रत्येकाशी सुसंवाद साधत असल्याची माहिती नामदेव भगत यांनी दिली.
ऍड. गायखे यांच्याशी तब्बल तासभर झालेल्या चर्चेत नामदेव भगत व गायखे यांनी आपल्या राजकीय वाटचालीतील आठवणींना उजाळा दिला. संघटनेत आपणास कशा पध्दतीने सर्वसमावेशक व सर्वांना विश्वासात घेवून काम करावयाचे असल्याचे भगत यांनी ऍड. गायखे यांना सांगितले. ऍड. गायखे यांनी शाल-पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करत शिवसेनेवरील एक पुस्तक भगत यांना भेट दिले.