* मनसेच्या पाठपुराव्याला यश
सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : घणसोली सेक्टर ७ व सेक्टर ९च्या चौकात गतीरोधक बसविण्याची सुबुध्दी अखेरीस नवी मुंबई महापालिका प्रशासनाला झाल्याने शुक्रवारी महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी युध्दपातळीवर गतीरोधक बसविण्यात आले. या ठिकाणी सातत्याने होणारे अपघात लक्षात घेवून या ठिकाणी गतीरोधक बसविण्याविषयी मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.
घणसोली कॉलनी हा परिसर सिडको प्रशासनाने नवी मुंबई महापालिका प्रशासनास अद्यापि हस्तांतरीत न केल्याने या ठिकाणी वास्तव्य करणार्या करदात्या नवी मुंबईकरांना नागरी सुविधांपासून वंचितच राहावे लागत असल्याची कैफीयत सादर करत मकरसंक्रांतीच्या दिनी मनसेचे शहर सचिव व स्थानिक रहीवाशी संदीप गलुगडे यांनी मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांना तिळगुळ देत समस्या सोडविण्याचे साकडे घातले.
मनसे घणसोलीच्या वतीने मनपा शहर अभियंता डगांवकर यांना निवेदन देवून घणसोली सेक्टर ७ व सेक्टर ९च्या चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी केली होती. सह शहर अभियंता राव यांनाही निवेदन देत सेक्टर ७ व सेक्टर ९च्या चौकात हायमस्ट बसविण्याची मागणी केली. हा परिसर सिडकोकडून हस्तांतरीत झाला नसल्याचे सांगत पालिका अधिकार्यांनी मनसे पदाधिकार्यांसमोर आपल हतबलता व्यक्त केली होती.
मकरसंक्रांतीच्या दिनीच मनपा शहर अभियंता व सह शहर अभियंता परिसर हस्तांतरणाचे जुनेच तुणतुणे वाजवत असल्याचे पाहून मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे व मनसेचे घणसोली विभाग अध्यक्ष सतीश केदारे यांनी तडक महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात जावून त्यांची भेट घेतली. घणसोली कॉलनीतील समस्या गलुगडे व केदारे यांनी पालिका आयुक्तांसमोर कथन केल्या होत्या.
घणसोली कॉलनी सेक्टर ७ सिम्पलेक्स व सेक्टर ९ घरौंदामधील रस्त्यावर भल्या पहाटे फळ मार्केट व भाजी मार्केटला काम करणारा माथाडी वर्ग कामासाठी उठून घराबाहेर जातो. त्यावेळी घणसोली रेल्वे स्थानक तसेच ठाणे-बेलापुर हायवे गाठण्यासाठी अंधारातून रस्त्यावरून चालताना त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. भटक्या व मोकाट कुत्र्यांचाही ससेमिरा अंधारातच चुकवित मार्केटला जावे लागते. म्हणून या परिसरात हायमस्ट बसविण्याची मागणी गलुगडे यांनी आयुक्तांकडे केली होती. याच ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून महिला आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी ये-जा करत असतात. रस्ता ओंलाडताना वाहतुक पहावी लागते. रहदारीचे वाढते प्रमाण व वाहनचालकांचे वाहन गतीप्रेम यामुळे अपघाताच्या तुरळक घटना येथे घडल्याचेही पालिका आयुक्तांच्या निदर्शनास गलुगडे व केदारे यांनी आणून दिले होते.
मनपा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मनसेकडून मांडण्यात आलेल्या हायमस्ट व गतीरोधक या दोन्ही मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकार्यांना दोन्ही समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतरही १५ दिवसामध्ये या चौकात तीन अपघाताच्या घटना घडल्या. प्रत्येक अपघात झाल्यावर मनसेचे संदीप गलुगडे यांनी पालिका प्रशासनात धाव घेत गतीरोधक नसल्यामुळेच या ठिकाणी अपघात होत असल्याचे संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले.
मनसेचे शहर सचिव संदीप गलुगडे यांचा पाठपुरावा आणि अपघाताचे वाढते प्रमाण यामुळे जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने शुक्रवारी, दि. ३० जानेवारी रोजी घणसोली सेक्टर ७ व सेक्टर ९च्या चौकात गतीरोधक बसविले. गतीरोधक बसविताना पालिका अधिकारी व कर्मचार्यांसोबत मनसेचे गलुगडे तिथेच उपस्थित होते. स्थानिक रहीवाशांकडून मनसेचे गलुगडे यांचे समस्या निवारणाबाबत अभिनंदन केले जात आहे.