सुजित शिंदे – ९६१९१९७४४४
नवी मुंबई : भाजपाप्रणित केंद्र सरकारने पूर्वाश्रमीच्या यु.पी.ए सरकार तसेच राहूल गांधी यांच्या पुढाकाराने सर्वसामान्य शेतकर्यांच्या हितासाठी बनविण्यात आलेल्या भूसंपादन कायद्यामध्ये अध्यादेश काढून भू-मालक व शेतकर्यांसाठी जाचक असा नवीन कायदा बनविण्यात आलेला आहे. सदर भूसंपादन कायदा हा शेतकर्यांसाठी अजिबात हितावह नसल्याकारणाने महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या वतीने किसान सत्याग्रह या नावाखाली सिबीडी बेलापूर येथील कोकण भवनवर धडक मोर्चा काढण्यात आला.
शनिवारी सकाळी ११ वाजता बेलापूर सेक्टर १५ येथून या मोर्चास सुरूवात झाली आणि अर्बन हार्ट या ठिकाणी या मोर्चाची सांगता झाली. सदर मोर्चाचे कोकणभवननजीक भव्य सभेत रूपांतर झाल्यावर कॉंग्रेसच्या उपस्थित नेतेमंडळींनी मोर्चामधील सहभागी युवक व शेतकर्यांना मार्गदर्शन करताना झालेल्या दुरुस्त्या रद्द होत नाही तोपर्यत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भाजपाप्रणित केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी भारतीय युवक कॉंग्रेसचे सरचिटणिस हिंमतसिंह, भारतीय युवक कॉंग्रेसचे चिटणिस हरिकृष्णा, ॠत्वित जोशी, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंगे्रसचे अध्यक्ष डॉ. विश्वजित कदम, उपाध्यक्ष सत्यजित तांबे, चिटणिस नंदा म्हात्रे, युवक कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष निशांत भगत यांच्या स्वाक्षर्यांचे निवेदन कोकण विभागिय आयुक्तांना सादर करण्यात आले.
यावेळी युवक कॉंग्रेसच्या मोर्चामध्ये युवक कार्यकर्त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, ठाणे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर, रायगडचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, नगरसेवक संतोष शेट्टी, अविनाश लाड, विलास भोईर, रामाशेठ वाघमारे, अकुंश सोनवणे, सुदर्शना कौशिक, सिंधू नाईक, प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉ. राजेश पाटील, श्याम म्हात्रे यांच्यासह नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.