* बकालपणाच्या विळख्यात अडकलाय भुखंड
* डेब्रिज, रॅबिट, सुकलेले गवतचा विळखा
* झोपड्यांबरोबर दुर्गंधीचाही सभोवतालच्यांना आहेर
संदीप खांडगेपाटील – ८०८२०९७७७५
नवी मुंबई : महाराष्ट्रातले राज्य परिवहन महामंडळ तोट्याच्या गर्तेत चालल्याचे गेल्या अनेक वर्षापासून पहावयास मिळत आहे. नवी मुंबई शहरात असणार्या महामंडळाच्या भुखंडाकडे कानाडोळा केल्याने या भुखंडावर अनधिकृत झोपड्या, डेब्रिजचे ढिगारे तसेच सुकलेले जंगली गवत, तुटलेल्या संरक्षक भिंती, दुर्गंधीच दुर्गंधी पहावयास मिळत आहेत. तुर्भे, कोपरी गावातील महामंडळाच्या अविकसित भुखंडाची विक्री केल्यास अथवा भुखंड विकसित करून त्याचा वापर केल्यास राज्य परिवहन महामंडळास कोट्यवधी रूपयांचा फायदा होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाने गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईतील आपल्या मालकीच्या भुखंडाकडे कानाडोळा केल्यामुळे या भुखंडांचा राज्य परिवहन महामंडळास विसर पडला की काय असा प्रश्न शिवसेनेचे नवी मुंबईतील नेते व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी उपस्थित केला आहे.
वाशी सेक्टर २६ परिसरात कोपरी गावामध्ये प.पू.डॉ. बापूजी सांळूखे मार्गालगतच पुनित कॉर्नरच्या समोरच राज्य परिवहन महामंडळाच्या मालकीचा एक विस्तीर्ण भुखंड आहे. मात्र या भुखंडाकडे राज्य परिवहन महामंडळाने गेल्या काही वर्षात लक्षच न दिल्याने महामंडळाच्या मालकीचा असल्याचा फलकच भुखंडाच्या मालकाचे इतरांना अस्तित्व दाखवून देत आहे. या अविकसित भुखंडामुळे परिसराला दुर्गंधी व बकालपणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
या भुखंडासभोवताली असणारी संरक्षक भिंत ठिकठिकाणी तुटलेली असून या भुखंडावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या विखुरलेल्या पहावयास मिळत आहे. भुखंडावर ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे, रॅबिट व डेब्रिजचे ढिगारे पहावयास मिळत आहे. या भुखंडावर सुकलेले गवतही पहावयास मिळत आहे. भुखंडावर रात्री-अपरात्री, दिवसाउजेडीही शौचासाठी व लघुशंकेसाठी वापर करताना पहावयास मिळतो.
राज्य परिवहन महामंडळाच्या या भुखंडाला आज पूर्णपणे बकालपणाचे स्वरूप प्राप्त झाले असून अनधिकृत झोपड्यांच्या विळख्यात हा भुखंड अडकलेला आहे. झोपडपट्टीधारकांचे मलमूत्र विसर्जनदेखील याच भुखंडाच्या रिक्त जागी होत असल्याने परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.
राज्य परिवहन महामंडळाने वाशी सेक्टर २६ मधील या भुखंडाची विक्री केल्यास अथवा भुखंड विकसित करून व्यावसायिक कामासाठी वापरल्यास महामंडळाला करोडो रूपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असल्याने महामंडळाने भुखंडाबाबत लवकरात लवकर निर्णय घेवून परिसराला बकालपणातून व भुखंडाला झोपड्यांच्या विळख्यातून सोडविण्याची मागणी शिवसेनेचे नवी मुंबईतील नेते व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी केली आहे.