मुंबई : ज्येष्ठ इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्यास संभाजी ब्रिगेडनं विरोध केलेला असतानाच, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही बाबासाहेबांच्या निवडीबाबत निषेधाचा सूर लावला आहे. बाबासाहेब पुरंदरे जर इतिहास तज्ज्ञ होते, तर जिजाऊंचा अवमान करणार्या जेम्स लेनच्या पुस्तकावर त्यांनी आक्षेप का घेतला नाही, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्यावरून मोठी शाब्दिक लढाई होऊ शकते.
‘जाणता राजा’ छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक कार्य जगभरात पोहोचवणारे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. बाबासाहेबांसारख्या सच्च्या शिवभक्ताचा, राज्य पातळीवरच्या सर्वोच्च पुरस्कारानं गौरव झाल्यानं त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदीआनंद पसरला आहे, पण त्याचवेळी काहींचा तीळपापडही झालाय. त्यात संभाजी ब्रिगेड सगळ्यात पुढे आहे. ज्या दिवशी हा पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाच त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन आपला निषेध नोंदवला होता. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे काल कल्याणमध्ये कर्फ्यूही लावावा लागला होता. त्या पाठोपाठ आता, जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांच्या शिवभक्तीवरच संशय घेत, ‘महाराष्ट्र भूषण’साठी त्यांची निवड चुकीची असल्याचं पटवण्याचा प्रयत्न केला आहे.
जिजाऊंचे चारित्र्यहनन करणार्या जेम्स लेननं आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाबासाहेब पुरंदरे यांचे आभार मानले आहेत, याकडे लक्ष वेधून आव्हाड यांनी ट्विटरवरून काही प्रश्न विचारले आहेत. बाबासाहेब पुरंदरे जर इतिहासतज्ज्ञ होते, तर लेनच्या पुस्तकावर त्यांनी आक्षेप का घेतला नाही?, प्रस्तावनेत आपलं नाव आल्याबद्दल खेद का व्यक्त केला नाही?, जेम्स लेनला मी माहिती दिली नाही, असं त्यांनी महाराष्ट्राला छातीठोकपणे का सांगितलं नाही?, अशी विचारणा त्यांनी केली आहे.
स्वाभाविकच, या प्रश्नांवरून उलटसुलट प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहेच, पण खुद्द बाबासाहेब त्यावर काही बोलतात का, याबद्दल उत्सुकता आहे. तसंच, पुरंदरेंबद्दल आदर असणारे शरद पवार आव्हाडांच्या शंकेबद्दल काय बोलतात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांचा कसा समाचार घेतात, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. ही मंडळी जर आणि जे काही बोलतील, त्यावर पुढचा वाद अवलंबून आहे.