संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : पामबीच मार्गालगत असणार्या सारसोळे जेटीवर सांयकाळी 7 नंतर अंधार पडत असल्याने मासेमारी करणार्या सारसोळेच्या आगरी-कोळी ग्रामस्थांना विविध अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. जाळी जाळणे, होड्या बुडविणे व अन्य दुर्घटना घडत असल्याने आणि अशी कृत्ये करणार्यांचा छडा लागत नसल्याने महापालिका प्रशासनाने सारसोळेच्या जेटीवर समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून शक्य तितक्या लवकर हायमस्ट उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी शिवसेनेचे प्रभाग 93 चे नगरसेवक व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त व सह शहर अभियंता यांच्याकडे सोमवारी (दि. 11 मे) निवेदनातून केली आहे.
सारसोळेच्या ग्रामस्थांना आजही उपजिविकेसाठी मासेमारीवरच अवलंबून रहावे लागत आहे. भरती-ओहोटीचे गणित सांभाळून दिवसाउजेडी, रात्री-अपरात्री त्यांना खाडीमध्ये मासेमारीकरता जावे लागते. सारसोळेच्या जेटीवर वीज उपलब्ध नसल्याने सांयकाळी 7 नंतर त्या ठिकाणी अंधार पसरतो. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समाजविघातक शक्तिंनी मासेमारी करणार्या सारसोळेच्या आगरी-कोळी लोकांची जाळी जाळली आहेत, होड्या बुडविल्या आहेत व अन्य सामानांची नासधुस केल्याच्या घटना घडत आहे. 26/11च्या सागरी दहशतवादी घटनेनंतर खाडीकिनार्यांची सुरक्षितता अविभाज्य भाग बनली आहे. सारसोळेची जेटी पामबीच मार्गालगत असली तरी त्या ठिकाणी अंधारात ये-जा करण्यास आगरी-कोळी मच्छिमारांना भीतीच्या छायेखाली वावरावे लागते. जाळी जाळणारे समाजविघातक प्रवृत्तींचा पोलिसांना अजून छडा लागलेला नसल्याचे नामदेव भगत यांनी निवेदनात नमुद केले आहे.
मासेमारी करणार्या सारसोळेच्या आगरी-कोळी बांधवांच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून महापालिका प्रशासनाने शक्य तितक्या लवकर सारसोळेच्या जेटीवर हायमस्ट उपलब्ध करून द्यावा तसेचसमस्येचे गांभीर्य जाणून घेण्याकरता आपण ज्यावेळी या समस्येच्या पाहणी अभियानाकरीता याल, त्यावेळी त्या पाहणी अभियानात आम्हासही सहभागी करून घ्यावे की जेणेकरून आपणास समस्यांचे गांभीर्य पटवून देणे आम्हाला शक्य होईल असे निवेदनामध्ये नामदेव भगत यांनी नमूद केले आहे.